इको-फ्रेंडली 'पाऊल' खुणा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

२७ वर्षांच्या पूजा आपटे-बदामीकर यांनी अनोखे स्टार्टअप सुरू केले. टायरपासून आम्ही ‘नेमिताल’ या स्टार्टअपद्वारे महिन्याला सुमारे २०० चप्पल बनवत आहेत.

पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या जुन्या टायरचा पुनर्वापर महत्त्वाचा ठरतो. पूजा आपटे-बदामीकर यांनी कंपनीतील नोकरी सोडून या टायर्सचा पुनर्वापर करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून ‘नेमितल’ नावाचे स्टार्टअप सुरू केले. टायरच्या प्रदूषणावर मात करीत त्यापासून उपयुक्त वस्तू बनविणाऱ्या या ‘पर्यावरणपूरक’ स्टार्टअपविषयी...

वापरलेले टायर हे लवकर विघटित होत नाहीत. ते पडून राहिले किंवा पेटवून दिल्यास त्यातून मातीचे व हवेचे प्रदूषण होते. पर्यावरणाला हानिकारक ठरत असलेले असे लाखो टायर दरवर्षी पडून असतात. त्यातून होणारे प्रदूषण कसे रोखता येईल, या विचारातून २७ वर्षांच्या पूजा आपटे-बदामीकर यांनी अनोखे स्टार्टअप सुरू केले. टायरपासून आम्ही ‘नेमिताल’ या स्टार्टअपद्वारे महिन्याला सुमारे २०० चप्पल बनवत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वापरलेल्या टायरपासून होणारी पर्यावरणाची हानी हा कायम दुर्लक्षित प्रश्‍न राहिला आहे. हे टायर भंगारात विकू किंवा जाळून टाकू, अशी मानसिकता आहे. मात्र, असे टायर अनेक वर्षे भोवताली पडून असतील किंवा पेटवून दिल्यास ते निसर्गाचे किती नुकसान करू शकतात, याची सर्वांनाच कल्पना असेल, असे नाही. हे टायर वापरून त्यांचा महिलांच्या फॅशनसाठी वापर करण्याचा ध्यास पूजा यांनी बाळगला आहे. या स्टार्टअपमधून अविघटनशील कचरा कमी झाल्याने पर्यावरणाचा ऱ्हास थांबत आहे. चपलांच्या उत्पादनातून असंघटित कामगारांना रोजगार मिळाला आहे, तर पुनर्वापराच्या टायरपासून ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या डिझाइनमध्ये चपला मिळत आहेत. पाच कारागीर आणि कामानुसार टेलर घेऊन चपला बनविणाऱ्या या स्टार्टअपची उलाढाल पहिल्याच वर्षी साडेसात लाखांच्या घरात पोचली आहे. मूळच्या पुण्यातीलच असलेल्या पूजा यांनी ‘इलेक्‍ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ केले आहे. तसेच, रिन्युएबल एनर्जी’ विषयात डिप्लोमा केला आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी चार वर्षे एका आयटी कंपनीत नोकरी केली. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी तयार होते चप्पल
चप्पल तयार करण्यासाठी ‘नेमिताल’ टायरच्या पट्ट्या विकत घेतो. मुंबईत मशिनद्वारे त्या हव्या असलेल्या आकारात कापल्या जातात. टायरचा सोल सोडून चपलेसाठी लागणारे बाकीचे साहित्य विकत घेतले जाते. चप्पल घातल्यानंतर आपला पाय ज्यावर असतो ते कार्डबोर्डचे बॉटम, कंपनीतील कारागिरांनी तयार केलेले टायरचे सोल, टेलरने बनविलेले कापडी बेल्ट हे सर्व मिळून चप्पल तयार होते. 

महिलांसाठी चप्पल बनविण्याच्या उद्योगात महिलांचे प्रमाण एक टक्के देखील नाही. फुटवेअर क्षेत्रात महिला काम करू शकत नाही, असे समजले जाते. मात्र, मी त्याला अपवाद ठरले आहे. मुळात स्त्रीने ठरविले तर ती कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकते. या व्यवसायासाठी आवश्‍यक असलेला संवाद समजल्यानंतर कोणतीही अडचण येत नाही, असा माझा अनुभव आहे. 
- पूजा आपटे-बदामीकर, संस्थापिका, नेमिताल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pooja Apte-Badamikar Nemital startup