तुले दिले रे देवानं, दोन हातं दहा बोटं

प्रशांत रॉय
बुधवार, 16 मे 2018

हातपाय गळून बसणे शक्‍य नाही. सकाळपासून अंधार पडेपर्यंत फक्त काम, काम आणि काम. ‘मेहनत करोगे तो फल मिलेगा ही’ या तत्त्वावर माझी मोठी निष्ठा आहे. येणारे गिऱ्हाईक माझ्यासाठी खरंच देवाप्रमाणे आहे. कारण माझ्या कुटुंबाचा रोजचा उदरनिर्वाह या मेहनतीवरच चालत आहे.
 -अशोक नेवारे

नागपूर - गेल्या ३५ वर्षांपासून सायकलमध्ये हवा भरणे, पंक्‍चर काढणे, इतर संबंधित कामे करतोय... कधी हातात ५० ते १०० रुपये पडतात, तर कधी दमडीही नाही... मुलाचा मृत्यू झाल्याने पार कोसळलो होतो... आता चार मुली आहेत लग्नाच्या... काय करावं हे सुचतच नाही... मात्र, कष्टाला पर्याय नाही, हे माहीत असल्याने मनाला उभारी दिली... ठरविलं जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत काम करीतच राहणार. 

ही जिद्द आहे अशोक नेवारे यांची. वय ५५ वर्ष, मात्र कष्ट एखाद्या तरुणाला लाजवतील एवढे. गरिबीमुळे शिक्षण घेऊ शकले नाही याचं शल्य त्यांना आहे. १५ ते १६ वर्षांचे असताना सायकलमध्ये हवा भरणे, पंक्‍चर काढणे आदी कामे पोटापाण्यासाठी शिकायला सुरवात केली. ते सांगतात सध्या भला मोठा दिसत असलेला काटोल रोड त्यावेळी नव्हताच. पाऊलवाटेवर कुठेही बसून आपला व्यवसाय करायचा. कारण त्याशिवाय काही येतही नव्हतं. त्याकाळी सायकल म्हणजे आजच्या दुचाकीपेक्षा जास्त रुबाब. वाहतुकीसाठी सर्वांत स्वस्त आणि सोपा उपाय सायकल होती. मलाही सायकल खूप आवडायची. आपल्याकडेही नवी कोरी करकरीत सायकल असावी, आपण त्यावर टांग मारून शहरभर मिरवावं असं वाटायचं. 

आर्थिक चणचण आणि परिस्थितीमुळे ही कल्पना काही त्यावेळी प्रत्यक्षात आली नाही. मात्र, सायकल संबंधित कामे करून मी आपली दुधाची तहान ताकावर भागवू लागलो. दोन पैसे हाती येऊ लागले. 

आजही नेवारे काटोल रोडवर हवा भरायचा पंप आणि इतर साहित्य घेऊन बसतात. त्यांचे अनेक वर्षांपासूनचे मित्र, गिऱ्हाईक आजही त्यांच्याकडे सायकल घेऊन येतात. जुन्या आठवणी काढत त्याच उत्साहाने नेवारे कामात व्यस्त होतात.

हरला तो संपला
लग्न झालं. प्रपंच सुरू झाला. मुलंही झाली. एका माणसाचा उदरनिर्वाह कसाबसा भागविणारा रस्त्यावरील सायकल व्यवसायावर आता चार-पाच जणांचे पोट सांभाळण्याची वेळ आली. अशातच मुलाचा मृत्यू झाला. म्हातारपणातील काठी हरविली. दुःखात काही दिवस असेच निघून गेले. पोटापाण्यासाठी पुन्हा काम करणे भाग होते. मनाला धीर दिला, समजावून सांगतिले की, चार मुली आणि पत्नीची जबाबदारी तुझ्यावरच आहे. हरायचं नाही. आज कठीण वेळ आहे. उद्या कदाचीत चांगले दिवस येतील, असा नेवारेंचा विश्‍वास अद्याप कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: positive story ashok nevare story