तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची...

प्रशांत रॉय
रविवार, 13 मे 2018

शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहण्यासाठी बहिणीच्या लग्नालाही गेलो नाही, तसेच विविध सणांनाही गावाकडे जाणे टाळतो. एकतर पैशाची चणचण आणि दुसरे म्हणजे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष. मात्र, आई-वडिलांसह सर्व कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा आहे. यामुळे समाजापुढे आदर्श राहील असे उदाहरण ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सगळ्या बाबींना टाळून केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे. एक यशस्वी अभियंता म्हणून मला ओळखले जावे हे माझे ध्येय आहे.
- बालाजी नानाजी मडावी 

नागपूर - ‘बहिणीचे लग्न आहे, कधी येऊ?’ कंठ दाटून आलेल्या भावाने वडिलांना विचारले. वडील उत्तरले, ‘अरे ताईच्या लग्नाचं मी, तुझी आई आणि नातेवाईक मंडळी बघून घेऊ. पोरा तू अभ्यासाकडं लक्ष दे. आपल्या समाजातून तू पहिला इंजिनिअर होणार आहेस. त्यासाठी झटून अभ्यास कर. इकडची काही काळजी करू नकोस. भविष्यातील घटनांचा वेध घेऊन पुढे चालत राहा.’

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तहसीलअंतर्गत मारोतीगुडा हे गाव. आधुनिक सोयीसुविधांपासून काहीसे दूरच. येथे नानाजी मडावी यांचे कुटुंब राहते. पत्नी, दोन मुली आणि तीन मुले. शिक्षणाचा गंध नाही, रोजगाराचा प्रश्‍न बिकट. पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीवर उदरनिर्वाह चालविणे अवघडच. यामुळे मोलमजुरी, शेतीतील पडेल ती कामे करून नानाजी प्रपंच चालवितात. शिक्षण नसल्यामुळे आपल्या कोलम समाजासह आपल्या कुटुंबाचीही दुर्गती होत आहे, हे सत्य मात्र त्यांना उमजलेलं. या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर आणि आर्थिक स्वावलंबी व्हायचे असेल तर मुलांना शिक्षण देण्यापासून  पर्याय नाही याची खूणगाठ त्यांनी बांधली.  नानाजी यांनी आपला मुलगा बालाजी याला जिवती येथील आश्रमशाळेत दाखल केले. बालाजीनेही आई-वडिलांच्या कष्टाकडे पाहून चांगले शिक्षण घेण्याचा आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रण केला. अनेक कठीण प्रसंग आले. आर्थिक अडचण तर पाचवीलाच पुजलेली. तरीही परिस्थितीपुढे हार न मानता  झपाटल्यागत अभ्यासात बुडवून घेतले आणि तो दिवसही आला. बालाजीला बारावीनंतर २०१२-१३ मध्ये व्ही. एम. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्‍नॉलॉजी (डोंगरगाव, जि. नागपूर) येथे प्रवेश मिळाला. यंदा बालाजीचे शेवटचे सेमिस्टार आहे. ते पूर्ण करून यशस्वी अभियंता म्हणून बालाजीला कारकीर्द घडवायची आहे. 

शहरी-ग्रामीण दरीचा परिणाम
दुर्गम ग्रामीण भागातील असल्याने प्रारंभी काही सुचतच नव्हते. शहरातील मुलांशी संवाद कसा साधावा, हासुद्धा मोठा प्रश्‍न होता. यामुळे इंजिनिअरिंगच्या पहिल्याच वर्षी काही विषय बॅक राहिले. खूप दुःख झाले. मग निश्‍चय केला की आई-वडिलांनी कष्टाचे जे बाळकडू दिले त्याच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलोय. आता हरायचे नाही. हिंमत केली, अभ्यास वाढविला आणि आता पदवीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलोय, असे सांगत बालाजीने आपल्या भावना व्यक्त केल्या. आदिवासींमध्ये कोलाम समाज हा आदिम असून अतिशय मागासलेला आहे. माझ्या शिक्षणाचा लाभ समाजासह देशालाही होईल, असा मी प्रयत्न करणार असून समाजातील युवकांमध्ये शिक्षणाप्रती जागृती निर्माण करणार असल्याचे बालाजीने सांगितले. 

Web Title: positive story Balaji will be the first engineer of the Kolam community