पोतराज ते प्राध्यापक: 'फकिरा'तून जगायला मिळाली वाट!

सूर्यकांत नेटके : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

डॉ. गायकवाड यांच्या 'मराठी साहित्यातील मातंग समाज' या संशोधन साहित्याचा आज हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य पुरस्काराने गौरव झाला. त्यांनी 'सकाळ'शी बोलताना संघर्षपट मांडला.

नगर : ''आजोबा, वडील, चुलते, चुलतभाऊ...कुटुंबाला पोतराज होण्याची परंपरा. आई-बापाने मलाही अंबाबाईला सोडून पोतराज केलं. गावगावांत बाजारात जाऊन हलगी वाजवत भीक मागायचो. अशातच 'जग' बदण्याचा विश्‍वास देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांची 'फकिरा' हातात पडली, वाचली अन्‌ जीवनाला नवा आयाम मिळाला. पोतराजाचा प्राध्यापक झालो, प्राध्यापकांचा डॉक्‍टर झालो. आयुष्य जगायला बळ मिळालं, वाट मिळाली. 'पुस्तकचं मस्तक बदतात' यावरचा विश्‍वास पक्का झाला.'' साताऱ्यांचे प्रगल्भ लेखक डॉ. शरद गायकवाड भावना व्यक्त करत जीवनप्रवास सांगत होते.

ते म्हणाले, ''साताऱ्याजवळील अंगापूर आमचं गाव. दुष्काळातला म्हणजे 1972चा जन्म. अनिष्ट रूढी-परंपरा जोपासणे. आमचे कुटुंब कोल्हापूरची लक्ष्मीमाता, कोल्हापूरच्या तुळजाभवानीचे भगत. घरात सहा-सात पोतराज. दुष्काळात जन्मलो, जगाच्या अडचणी म्हणून कोल्हापूरच्या लक्ष्मीला सोडत मलाही पोतराज केलं. मी बाल पोतराज, अंगाला अबरान, पायाला चाळ, खांद्यावर आसूड घेत सगळ्यांसोबत बाजार असलेल्या गावांत जाऊन शुक्रवारी, मंगळवारी, हलगी वाजून भीक मागायचो. आरती म्हणायचो. वडील पाटलांच्या घरी सालगडी होते. पोतराज असलो तरी शाळा शिकत होतो.

वडील सालगडी असलेल्या मुंबईत राहणाऱ्या मुलाने गावी येताना सहजपणे अण्णा भाऊ साठे यांची 'फकिरा' कांदबरी आणली अन्‌ माझ्या वडिलांकडे सहज दिली. वडिलांकडून ती माझ्या हातात पडली, 'फकिरा' कादंबरीचे चित्र नगरच्या नाथ वैराळांनी काढलेले. चित्र पाहून भारावलो. वयाच्या बाराव्या वर्षी फकिरा वाचण्यात आली अन्‌ माझ्या जीवनाचे चित्र बदलले. त्याच वर्षी स्वतःचे केस मीच कापले. 'जगायचं तर फकिरा सारखं' ठरवून काम सुरू केलं. साताऱ्यामध्ये जगण्याचा संघर्ष करत उच्च शिक्षण घेतले.

28 वर्ष मातंग समाजावर अभ्यास केला. आठ वर्षांपूर्वी 'त्या विषयावर पीएच.डी.' करणारा मी पहिला साहित्यिक आहे. अण्णा भाऊ साठेंचे बंधू शंकर भाऊ साठे यांच्या 'सोळा कांदबऱ्यांचा अभ्यास' या विषयावर 1999 ला 'एम.फील.' करणारा मी पहिलाच आहे. साताऱ्याला शिक्षण घेताना ज्येष्ठ साहित्यिक आ. ह. साळुंखे, नरेंद्र दाभोलकर, लक्ष्मण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जटा निर्मूलनाचे काम करत 38 पोतराजांचे केस कापले. मुळात फक्त अण्णा भाऊ यांनाच मानत होतो; पण 'जग बदलायला बाबासाहेबांनी सांगितल्यावर मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारांनी काम करत गेलो. हे सारे असले तरी अण्णा भाऊंच्या एका कांदबरीने मला जगायला आयुष्याचा रस्ता दाखवला.''

सोळा कादंबऱ्या लिहून उपेक्षित
डॉ. गायकवाड यांच्या मते ''अण्णा भाऊ साठे यांनी 36, तर त्यांचे भाऊ शंकर भाऊ साठे यांनी 16 कादंबऱ्या लिहिल्या. अनेक कादंबऱ्या जीवंत माणसावर आहेत. एका कादंबरीतील लखुजी मांग या नायकाला मी भेटलेलोही. शंकर भाऊंच्या साहित्यावर, लेखनावर चर्चा केली; पण कोणी दखल घेतली नाही. मोठ्या झाडाजवळ छोटे झाड वाढत नाही, असे म्हणतात ते यातून स्पष्ट होतेय. शंकर भाऊंचे साहित्य अजूनही फार लोकांच्या वाचनात आलेच नाही.''

Web Title: potraj to professor : fakira showed the path