शेततळं... छे, शेतातील समुद्रच!

अजित झळके
रविवार, 8 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

प्रीतम पाटील यांनी कालव्याचे पाणी साठवायचे ठरवले. साठवलेल्या पाण्यावर ३० एकर शेतीमध्ये पपई, केळीसारखी पिके घेतली. भाजीपाला घेतला. द्राक्ष, उसाला फाटा दिला. सर्व क्षेत्रांवर एकटाक ठिबक केले. मळा चोहोअंगांनी फुलला.

मिरज तालुक्‍यातील एरंडोली आणि आरग गावांच्या मध्यावर एक भलं मोठं शेततळं आहे... पेपर टॅंक. त्याची क्षमता आहे तब्बल दोन कोटी लिटर पाणी साठवण्याची. तीन एकर क्षेत्रात पसरलेलं हे तळं म्हणजे चक्क शेतातील समुद्रच आहे. पाणी साठवून त्याचा थेंब अन्‌ थेंबाचा कसा वापर केला पाहिजे, याचा आदर्श म्हणजे हा प्रयोग आहे. चिपरी गावातील तरुण शेतकरी प्रीतम पाटील यांनी हा प्रयोग केला असून तरुण शेतकऱ्यांसाठी दुष्काळात पाण्याच्या वापराचा आदर्श त्यातून निर्माण झाला आहे.

आरग हे दुष्काळी टापूतील गाव. जमिनीचा दर्जा चांगला; मात्र पाण्याची उपलब्धता जेमतेम. हा प्रश्‍न म्हैसाळ उपसा सिंचन योजनेने दूर केला. गावात पाणी खेळू लागलं, मात्र त्याची शाश्‍वती नव्हती. कधी जानेवारीत तर कधी मार्चमध्ये पाणी सुटते. अशावेळी बागायती पिके घेऊन जुगार खेळायचा कसा? त्यावर प्रीतम यांनी उपाय शोधला, कालव्याचे पाणी त्यांनी साठवायचे ठरवले. किती? तर किमान दोन वर्षे पाऊस पडला नाही तरी शेतीला पुरेल एवढे. त्यांची ३० एकर शेती. त्यात पपई, केळीसारखी पिके घेतली. भाजीपाला घेतला. द्राक्ष, उसाला फाटा दिला. सर्व क्षेत्रांवर एकटाक ठिबक केले. त्याचे ऑटोमाइजेशन करून खते आणि पाणी देण्याची व्यवस्था फक्त एका क्‍लिकवर आणली. संगणकावर कार्यक्रम भरला की त्याप्रमाणे यंत्रणा काम करते. पाणी कमी पडेल, जास्त होईल, याची चिंता करायचे कारणच नाही. पाणी व खताची बचत झालीच, शिवाय मनुष्यबळही कमी लागते. त्यामुळे उत्पादन खर्चात घट झाली आणि उत्पन्नही चांगले वाढले, असे ते सांगतात.

ही सर्व यंत्रणा एका खोलीतून कार्यरत आहे. संगणकावर कार्यक्रम निश्‍चिती करण्यापूर्वी तापमानाचा अंदाज घेतला जातो. आता पाणी दिले तर ते शेतात किती काळ ओलावा टिकून धरेल, याचा पक्का अंदाज तेथे येतो. माती परीक्षण केल्याने खते किती द्यायची, याचे व्यवस्थापन उत्तम होते. कालव्याच्या शाश्‍वतीची चिंता त्यांना राहिली नाही. असा प्रयोग काही अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केला तर विकासाला नक्कीच गती देता येईल, पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल, असेही श्री. पाटील सांगतात.

Web Title: pritam patil success stories