मानसिकता बदलातूनच उद्योजकता विकास! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

राजकारण्यांनी शहरांबरोबर गावांमधील गरजा आणि तरुणाईची महत्त्वाकांक्षा लक्षात घेण्याची गरज आहे. राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीतील तरुणाईला याची जाणीव होण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे. ‘भारतीय छात्र सांसद’सारख्या उपक्रमातून आम्ही विद्यार्थी आणि प्रस्थापित राजकारण्यांना एकत्र आणून संवाद घडवितो. या संवादाच्या प्रक्रियेतूनच बदल घडतो. प्रियांकासारख्या गव्हर्नन्सच्या विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ त्यांच्या गावांमध्ये पोचवला आहे.
- राहुल कराड,  संस्थापक, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट

स्टार्ट अप इंडिया, स्टॅंड अप इंडिया, डिजिटल इंडिया अशा अनेक योजना सध्या राबविल्या जात आहेत आणि त्याला नागरिकांकडून प्रतिसादही मिळत आहे. मात्र, या योजना फक्त शहर किंवा निमशहरी भागांपुरत्या मर्यादित न राहता गावागावांमध्ये पोचल्या पाहिजेत आणि यशस्वी झाल्या पाहिजेत. त्यासाठी राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुण-तरुणींनी तंत्रज्ञानाविषयी आपली मानसिकता आणि दृष्टिकोन सकारात्मक ठेवून काम करण्याची गरज आहे. 

प्रियांका मेदनकर ही २५ वर्षांची तरुणी मेदनकरवाडीची (ता. खेड) सरपंच आहे. संपूर्ण गावात वाय-फाय कनेक्‍टिव्हिटी देणे, वॉटर प्युरिफायर प्लॅंट बसवणे, ई-रिक्षा सेवा सुरू करणे असे अनेक विधायक उपक्रम हे विविध छोट्या कंपन्यांच्या मदतीने प्रियांकाने राबविले आहेत. गावामध्ये असलेल्या ५० महिला बचत गटांसाठी प्रियांकाने कंपन्यांच्या मदतीने काही उद्योग व्यवसाय आणले आहेत. तसेच ‘स्किल इंडिया’ योजनेअंतर्गत गावामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रही सुरू केले आहे. 

एमआयटीच्या स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमधून ‘मास्टर्स इन गव्हर्नन्स’ हा अभ्यासक्रम पूर्ण केलेली प्रियांका म्हणते, ‘‘शिक्षणाचा उपयोग प्रत्यक्षात ग्रामपंचायतीमार्फत विविध योजना राबवून करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र गावातील ज्येष्ठ लोकांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढला. आता ‘स्मार्ट सिटी’ योजनेप्रमाणेच मेदनकरवाडी ‘स्मार्ट व्हिलेज’ म्हणून विकसित करण्याची महत्त्वाकांक्षा आहे.’’

उद्योजकता म्हणजे तंत्रज्ञान आणि कौशल्याच्या आधारे अडचणींवर मात करून उपाय शोधणे असते. शहरांबरोबरच गावांमध्येही नवउद्योजक निर्माण होण्यासाठी नव्या पिढीतील राजकारण्यांचीही प्रयत्न करावेत. बेरोजगारी आणि गरिबी हटविण्यासाठीचा रामबाण उपाय कौशल्य आणि उद्योजकता विकास आहे. उद्योग क्षेत्रातील मंडळींनी त्यांच्या खासगी पातळीवर नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध संस्था, संघटना स्थापन केल्या आहेत, मात्र राजकारण्यांची मानसिकता बदलण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.

Web Title: Priyanaka Medankar Success stories