कुपोषणमुक्तीसाठी ‘प्रोजेक्‍ट कोमाल’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

दीड हजार मुलांवर उपचार
झोपडपट्ट्यांमध्ये ‘प्रोजेक्‍ट कोमाल’ सुरू केल्यापासून ९५ टक्‍क्‍यांहून अधिक मुले शाश्‍वतरित्या निरोगी कक्षेत आली. गेल्या दोन वर्षांत एकही व्यक्ती कुपोषित आढळली नाही. काळाखडक वसाहतीनंतर हा प्रकल्प आणखी काही झोपडपट्ट्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. तसेच, टाटा मोटर्सने गेल्या वर्षभरात ‘आरोग्य’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील तीन लाखांहून अधिक व्यक्तींची तपासणी केली. दरवर्षी २०० हून अधिक कुपोषित मुलांवर उपचार केले जात आहेत. गेल्या पाच वर्षांत पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील दीड हजार कुपोषित मुलांवर उपचार केले आहेत, असे टाटा मोटर्सचे सीएसआर (सामाजिक दायित्व निधी) विभागप्रमुख विनोद कुलकर्णी यांनी सांगितले.

पिंपरी - सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून टाटा मोटर्सने देशातील कुपोषणाचा सामना करण्यास २०१४ मध्ये प्रारंभ केला. त्याअंतर्गत पुणे प्लांटने ‘प्रोजेक्‍ट कोमाल’ अर्थात कुपोषणाविरुद्ध लढा (कोम्बॅटिंग मालन्यूट्रिशन) हाती घेतला. त्याचा प्रारंभ वाकडच्या काळाखडक झोपडपट्टीपासून केला. त्यामुळे वाकडच्या काळाखडक झोपडपट्टीतील ९० टक्‍क्‍यांहून अधिक मुले निरोगी कक्षेत आली आहेत. 

राज्य सरकारचा कुटुंब व बालकल्याण विभाग, सरकारी रुग्णालये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इंटर एड डेव्हलपमेंट संस्था यांची मदत टाटा मोटर्सने ‘प्रोजेक्‍ट कोमाल’साठी घेतली. त्यामाध्यमातून सर्वसमावेशक समुदायाधारित उपाययोजना विकसित केली. 

प्रकल्प राबवताना कुपोषित, अतिकुपोषित मुले अशी वर्गवारी केली. मुलांना विशेष आहार देण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले. ‘समुदाय दुवा’ म्हणून ते काम करू लागले. त्याद्वारे कुपोषित मुलांना रोज विशेष आहार मिळू लागला. झोपडपट्ट्यांमधील महिलांना स्वतःसह मुलांच्या आरोग्य व स्वच्छतेबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. कुपोषित मुलांच्या कुटुंबांत स्वयंपाकाच्या चांगल्या पद्धतींचा अवलंब केला. पाणी, आरोग्य, स्वच्छता याबद्दल त्यांना माहिती दिली. 

पथनाट्ये व भारुड यामाध्यमातून माहिती व मनोरंजनाची सांगड घालून प्रबोधन केले. सरकारी योजनांची माहिती दिली. परिसरातील दुकानांमध्ये जंक फूडऐवजी पोषक अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवावेत, असे आवाहन दुकानदारांना केले. आहाराच्या अधिक चांगल्या सवयी लागाव्यात, यासाठी मुलांशी संवाद साधला. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे.

दृष्टिक्षेप
३ लाख वर्षभरात देशात तपासणी 
१५०० मुले पाच वर्षांत शहरात उपचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Project Komal for Malnutrition Free