बघता बघता देखणं घर उभं राहिलं...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

पुणे - ‘‘आम्ही पत्र्याच्या छोट्या खोलीत राहायचो. कचरा घ्यायच्या निमित्ताने सोसायटीतील फ्लॅटमध्ये जात असे. तेव्हा वाटायचं, आपलंही इतकचं छान, सुंदर अन्‌ देखण घरं असावं. कधी कधी तर स्वप्नही पडायचं. लक्ष्मीताईंच्या घरचे काम सुरू असताना माझेही घर असे बनवाल का? असे विचारले. पैसे ठरले, आणि बघता बघता हे देखणं घर उभं राहिलं. आता माझ्याकडेही किचन, बेडरूम आणि निवांत बसण्यासाठी ‘गॅलरी’ आहे.’’ औंधमधील इंदिरानगर वसाहतीमधील पिंकी सोनवणे बोलत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता ‘डेकोरेटिव्ह’ आणि ‘फूल फर्निश्‍चड’ घरात राहण्याचा निस्सीम आनंद !

पुणे - ‘‘आम्ही पत्र्याच्या छोट्या खोलीत राहायचो. कचरा घ्यायच्या निमित्ताने सोसायटीतील फ्लॅटमध्ये जात असे. तेव्हा वाटायचं, आपलंही इतकचं छान, सुंदर अन्‌ देखण घरं असावं. कधी कधी तर स्वप्नही पडायचं. लक्ष्मीताईंच्या घरचे काम सुरू असताना माझेही घर असे बनवाल का? असे विचारले. पैसे ठरले, आणि बघता बघता हे देखणं घर उभं राहिलं. आता माझ्याकडेही किचन, बेडरूम आणि निवांत बसण्यासाठी ‘गॅलरी’ आहे.’’ औंधमधील इंदिरानगर वसाहतीमधील पिंकी सोनवणे बोलत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता ‘डेकोरेटिव्ह’ आणि ‘फूल फर्निश्‍चड’ घरात राहण्याचा निस्सीम आनंद ! निमित्त आहे, कष्टकरी संघटना व संस्थांच्या पुढाकारातून उभा राहिलेल्या ‘ए स्टेप टुवर्डस होम’ या अभिनव उपक्रमाचे!

सोसायटीतील फ्लॅटसारखे आपलेही घर व्हावे, ही इच्छा कचरावेचक, घरकाम करणाऱ्या महिलांच्या मनात असते. कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत (केकेपीकेपी) व स्वच्छ सारख्या संस्थांनी यात पुढाकार घेतला आणि सुरू झाला अल्पदरात कष्टकऱ्यांच्या घरांच्या पुनर्रचनेचा उपक्रम. ‘स्वच्छ’ संस्थेमार्फत सकाळनगर परिसरात दहा वर्षांपासून पिंकीताई घरोघरी कचरा वेचत आहेत. त्यांच्या या बदललेल्या घराच्या स्वरूपाबद्दल त्या म्हणाल्या, ‘‘पूर्वी पत्र्याचे घर होते. पावसाळ्यात त्याला गळती लागायची. एकदा लक्ष्मीताईंच्या घरी फर्निचरचे काम सुरू होते.

त्या वेळी मी त्यांना विचारले, माझ्याही घराचे असे काम कराल का? तेव्हा त्या हो म्हणाल्या. त्यानंतर साठवलेले पैसे आणि थोडे उसनवारी करून दुरुस्तीसाठी पैसे उभारले. आता माझ्या घरातही फ्लॅटसारखे किचन, डायनिंग टेबल, घरातच संडास, बाथरूम आहे. टेरेसवर मोकळी हवा..असं सारं काही आहे.’’

घरकाम करणाऱ्या शीतल शिंदे यांच्याही घराचे काम सध्या जोरात सुरू आहे. त्या म्हणाल्या, ‘‘घरोघरी धुणीभांडी करताना, आपलेही असे घर असावे, असे वाटत होते. इच्छा असली तरी पैशांची चणचण होती. या उपक्रमामुळे कमी पैशात घराची दुरुस्ती होत आहे. माझे स्वप्न पूर्ण होणार, याच्यासारखा दुसरा आनंद नाही.’’ 

वास्तुविशारद सार्थक तपस्वी म्हणाले, ‘‘कष्टकऱ्यांच्या घराची दुरुस्ती, पुनर्रचना, इंटेरिअर डेकोरेशन करतानाच नैसर्गिक प्रकाश, हवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ‘स्वच्छ’ व ‘केकेपीकेपी’ सदस्यांच्या २० घरांचे काम सुरू होईल, त्याचे डिझाइन व खर्चाचे काम अंतिम टप्प्यात आहे.’’

केकेपीकेपी व स्वच्छ सदस्य - ९०००
सध्या काम सुरू असलेली घरे - २०
या प्रकल्पात काम करणारे वास्तुविशारद  - १६ 
काम पूर्ण झालेली घरे- ४
घराची पुर्नरचनेसाठीचे इच्छुक- ८०

अनुदानाची मागणी
महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव हे या उपक्रमामुळे प्रभावित  झाले आहेत. डॉ. आढाव यांनी कष्टकऱ्यांची घरे चांगली व्हावीत, यासाठी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्याकडे या घरांसाठी अनुदानाची मागणी केली आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनी या उपक्रमाचे कौतुक करत काही घरांना भेटीही दिल्या. ‘क्रेडाई’ आणि ‘एमबीव्ही’ यांनीही या उपक्रमासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

Web Title: pune news dream home