बहिणींनी पेटवली शिक्षणाची ‘पणती’

सुवर्णा चव्हाण 
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

आता शिक्षणच महत्त्वाचे 
सुनीता म्हणाली,‘‘आमच्या जातीत मुली शिकत नाहीत, या कारणाने आमचे शिक्षण थांबवले. आता १७ व्या वर्षी कविताचे लग्न लावून देण्याचा वडील प्रयत्न करीत आहेत; पण आम्हा दोघींना शिकायचे आहे. स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. म्हणूनच आम्ही रात्र प्रशालेत शिकण्यासाठी येतो. आमचा भाऊ बारावीमध्ये शिकतोय; पण आताही आमच्या शिक्षणाला वडिलांचा विरोधच आहे. असे असले तरी शिक्षण हे खूप महत्त्वाचे असून, जात-नातेवाईक यांच्या पलीकडे समाजाने विचार करण्याची गरज आहे. आम्ही आमचे शिक्षण थांबू देणार नाही.’’

पुणे - लोक नावं ठेवतात अन्‌ आपल्या जातीत मुलींनी शिकू नये, अशा मानसिकतेने त्यांच्या वडिलांनी त्यांचे शिक्षण थांबवले...सुनीता ही आठवीला शिकत होती तर कविता ही सातवीला (दोघींची नावे बदलली आहेत)...हे इथेच थांबले नाहीत..तर ‘जाती’च्या चौकटीत अडकलेल्या वडिलांनी सुनीताचे लग्न लावून दिले अन्‌ दोघींच्या शिक्षणाला पूर्णविराम मिळाला...पण, शिकण्याचा ध्यास व जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती...सुनीताने संसार सोडला अन्‌ कविताने घरच्याचा निर्णयाला विरोध केला अन्‌ दोघींनी थेट रात्र प्रशाला गाठली...‘जाती’ची कवाडे तोडून अन्‌ जग काय म्हणेल या विचारसरणीला बाजू सारून दोघी बहिणी आठवीत शिकत आहेत...अजूनही त्यांना संघर्ष करावा लागत आहेच...पण, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द आणि आत्मविश्‍वासाने या संघर्षातही त्यांच्या हातात लेखणीचा प्रकाश तेवत ठेवला आहे...

सुनीता आणि कविता  (नाव बदलले आहे) या दोघीही सरस्वती मंदिर संस्थेच्या पूना नाइट हायस्कूलमध्ये आठवीत शिकतात. अवघे सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या २१ वर्षीय सुनीताला आणि १७ वर्षीय कविता आता स्वतःच्या हिमतीवर शिकत आहेत. तेही घरच्यांचा विरोध पत्करून. किराणा मालाचे दुकान चालवणाऱ्या दोघींच्या वडिलांना नकोशा होत्या. त्यांनी कधीही त्यांच्याशी नीट संवादही साधला नाही. मात्र, भावाला शिकण्याची परवानगी आणि मुलींनी का शिकावे? हा प्रश्‍न ‘जातीत’ल्या लोकांनी उपस्थित केला. 

आपल्या जातीत मुली शिकत नाहीत, या कारणास्तव नातेवाइकांनीही त्याच्या शिकण्यावर वडिलांकडे विरोध केला आणि नातेवाईक-समाज काय म्हणेल या भीतीपोटी त्यांनी दोघींचे शिक्षण थांबवले. १८ वर्षी सुनीताचे लग्न लावून दिले. तिथेही तिला मोठ्या अडचणी सहन कराव्या लागल्या...त्याचा विरोध करण्यासाठी सुनीताने माहेर गाठले...त्यानंतर तिचा आणि कविताचा नव्याने शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. आज घरच्यांचा विरोध पत्करूनही दोघी शिकत असून, सुनीता आणि कविताला पोलिस अधिकारी व्हायचे आहे.

Web Title: pune news education sister inspiration