अभियंत्याच्या हातभाराने थांबली मुलींची पायपीट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

अमेरिकेतील नितीन बिचकर यांचे दातृत्व; चांदखेडमधील विद्यार्थिनींना मिळाल्या सायकली

सोमाटणे - ‘ई-सकाळ’वरील बातमी वाचून लायन्स क्‍लबच्या माध्यमातून अमेरिकेच्या अभियंत्याकडून चांदखेडमधील माध्यमिक शाळेतील मुलींना सायकलींची मदत केली. त्यामुळे त्यांची सहा किलोमीटरची पायपीट थांबली.

अमेरिकेतील नितीन बिचकर यांचे दातृत्व; चांदखेडमधील विद्यार्थिनींना मिळाल्या सायकली

सोमाटणे - ‘ई-सकाळ’वरील बातमी वाचून लायन्स क्‍लबच्या माध्यमातून अमेरिकेच्या अभियंत्याकडून चांदखेडमधील माध्यमिक शाळेतील मुलींना सायकलींची मदत केली. त्यामुळे त्यांची सहा किलोमीटरची पायपीट थांबली.

पाचाणे, पुसाणे, कुसगाव, कासारसाई, आढले येथे माध्यमिक शाळा नसल्याने येथील मुलींना सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदखेड येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’च्या पिंपरी-चिंचवड टुडेमध्ये व ‘ई-सकाळ’मध्ये प्रकाशित झाले होते. ते वाचून अमेरिका येथील आयटी पार्क कंपनीतील अभियंता नितीन बिचकर यांनी मदतीचा हात पुढे केला. भारतातील ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने त्यांनी आपली बहीण प्रा. शैलजा सांगळे यांच्याशी संपर्क साधून लायन्स क्‍लब पुणे भोसरीच्या सहकार्याने २० मुलींना सायकली भेट दिल्या. गेल्या वर्षीही त्यांनी शिक्षणासाठी मुलींची पायपीट ही ‘ई-सकाळ’वरील बातमी वाचून मावळातील १२ मुलींना सायकली भेट दिल्या होत्या. या वर्षी शाळेत नव्याने दाखल झालेल्या आणखी २० गरजू मुलींना सायकली दिल्या.

सायकलींचे वाटप प्रा. सांगळे, शैलजा आपटे, प्रशांत कुलकर्णी, बाळकृष्ण जोशी, सतीश देशमुख, दीप्ती पाटील, अनिल झोपे आदींच्या हस्ते झाले.
‘‘आम्हाला सायकली मिळाल्याने आमचा प्रवासाचा वेळ वाचणार असून या वेळेचा उपयोग आम्ही अभ्यासासाठी करू व चांगली गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करू,’’ असे मत या मुलींनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news nitin bichkar cycles gives to chandkhed girls student