अशिक्षित घरात उच्च शिक्षणाचा प्रकाश!

अशिक्षित घरात उच्च शिक्षणाचा प्रकाश!

पुसेसावळीतील सीताबाई पवार यांच्या चार मुली प्रिन्सिपल, मुख्याध्यापक, प्राध्यापकपदी

पुसेसावळी - ज्या काळी ‘चूल आणि मूल’ ही व्याख्या महिलांसाठी लागू होती. त्या काळी येथील चर्मकार समाजामधील सीताबाई पवार यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपल्या चारही मुलींना उच्च शिक्षित केल्याने आज त्या चारही मुली शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून आईने कष्ट करून दिलेल्या शिक्षणाचा वापर समाजहितासाठी करत आहेत. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अशा कर्तृत्वान आणि प्रतिकूल परिस्थितीला आव्हान देत मुलींना उच्च शिक्षण देणाऱ्या माउलींच्या कार्याला सलाम करायला हवा.

पुसेसावळीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लाडेगाव येथील श्रीपती गुजरे यांची कन्या सीता या पुसेसावळी येथे नाना पवार यांचा मुलगा तुकाराम यांच्याबरोबर विवाहबद्ध होऊन येथे आल्या आणि प्रापंचिक जीवन जगू लागल्या. दोघेही अशिक्षित अन्‌ पतीची परिस्थिती अत्यंत बिकट. रोजगार केल्याशिवाय घरातील चूल पेटत नसे. लग्नानंतर एकापाठोपाठ चार मुलींना जन्म दिल्याने सासू- सासरे नाराज झाले; पण पती तुकाराम यांनी मात्र सीताबाईंना कधी त्रास अथवा छळ केला नाही. पतीच्या सहकार्याने सीता यांनी आपल्या मुलींचा सांभाळ करताना मुलींच्या शिक्षणाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. प्रसंगी गावातील लोकांच्या घराच्या भिंती सारवल्या. शेतात मजुरी केली आणि चारही मुलींना उच्च शिक्षित केले. 

आज सीता यांच्या चारी मुली शिक्षण क्षेत्रात उच्च पदावर काम करीत आहेत. थोरली कन्या लता बाबर या एमए, एमएड असून, त्या मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाल्या आहेत. दुसरी कन्या डॉ. मंजुश्री बोबडे या एमए, एमफिल, पीएचडी करून औंध (पुणे) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्राचार्यपदी कार्यरत आहेत. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या ‘कमवा आणि शिका’ या योजनेतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या नंतरची तिसरी कन्या सीमा सूर्यवंशी या कवठेमहंकाळ (सांगली) येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत, तर चौथ्या नंबरच्या डॉ. मुक्ता पोटे यांनी एमएबीपीएड, एमफिल, पीएचडी करून मुंबई येथे सोमय्या महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत. 

अशा या सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य कर्तृत्व असणाऱ्या सीताबाई या आजही वयाच्या ८२ व्या वर्षी धडधाकट असून, दोन मुलांच्या प्रपंचास होता होईल एवढा हातभार लावत आहेत. त्यांचा थोरला मुलगा शेती करत असून, लहान मुलगा ज्ञानदेव पवार हा समाजकार्याची उच्च पदवी घेऊन पुसेसावळी परिसरात समाजकार्यात अग्रेसर आहे. एक स्नुषा मंगल पवार या विद्यमान  ग्रामपंचायत सदस्या आहेत, सर्व नातीही उच्च शिक्षित आहेत.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनाही प्रोत्साहन
आपल्या मुलींना शिक्षित करताना सीताबाई यांनी आपल्या दिराच्या मुलीलाही उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत या त्यांच्या पुतनी. घरामध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त आणि फक्त शिक्षणाच्या जोरावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून भाग्यवंत यांनी केलेली कामगिरी म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांपुढे आदर्श निर्माण करणारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com