तेजाळली रजनीगंधा..!

संभाजी गंडमाळे
रविवार, 8 एप्रिल 2018

कोल्हापूर - दहावीला असताना पहिल्या सेमिस्टरनंतरच तिची दृष्टी अंधूक होऊ लागली. रायटर आणि ऑडिओ बुक्‍स ऐकतच मग तिने दहावी, बारावीपासून ते ग्रॅज्युएशन, दोन विषयांत पोस्ट ग्रॅज्युएशन, सेट, नेटसह ‘बी.एड.’ही पूर्ण केले.

कोल्हापूर - दहावीला असताना पहिल्या सेमिस्टरनंतरच तिची दृष्टी अंधूक होऊ लागली. रायटर आणि ऑडिओ बुक्‍स ऐकतच मग तिने दहावी, बारावीपासून ते ग्रॅज्युएशन, दोन विषयांत पोस्ट ग्रॅज्युएशन, सेट, नेटसह ‘बी.एड.’ही पूर्ण केले.

क्‍वालिफिकेशन एवढे असले तरी अनेकांचे उंबरे झिजवूनही दृष्टिदोषामुळे तिला कुणी नोकरी दिली नाही. दरम्यान, तिने स्पर्धा परीक्षातही स्वतःचे नशीब आजमावायचे ठरविले. आजवर तब्बल १७ ते १८ विविध स्पर्धा परीक्षांचीच परीक्षा तिने घेतली आणि अखेर यशाला गवसणी घातली. नुकत्याच झालेल्या बॅंकिंग परीक्षेतून तिची निवड विजया बॅंकेसाठी झाली... ही तेजाळलेली यशकथा आहे, कळंबा येथील रजनीगंधा वेळापुरेची. 

कळंबा परिसरातील महाराष्ट्र कॉलनीतील वेळापुरे कुटुंब. रजनीगंधासह तीन बहिणी, एक भाऊ आणि आई-वडिलांसह संसाराचा गाडा सुरूच होता.

वडिलांचा सहल संयोजनाचा व्यवसाय. पद्‌माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकत असताना रजनीगंधा दहावीला आली आणि पहिल्या सहामाहीनंतर तिला दृष्टिदोष सुरू झाला. त्यावर मात करीत दहावीची परीक्षा तिने रायटरच्या सहाय्याने दिली. मात्र, ‘रडायचं नाही, लढायचं’ हा मूलमंत्र 
तिला प्रेरणा देत राहिला. बारावीनंतर तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. हिंदी आणि समाजशास्त्र या दोन्ही विषयांत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. बी.एड., हिंदी विषयात सेट-नेट केले, तरीही नोकरी नाही. वडिलांसह अनेक संस्थांत जाऊन तिने मुलाखती दिल्या. पण, ‘क्वालिफिकेशन चांगले असले तरी दृष्टिदोषामुळे तुला शिकवता येणार नाही’ असेच उत्तर मिळायचे. अभय ॲड एजन्सीचे अभय मिराशी यांनी मग आमदार सतेज पाटील यांच्याशी या बाप-लेकीची भेट घालून दिली आणि एक वर्षापूर्वी कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात ती मुलांना शिकवू लागली. तिचा आत्मविश्‍वास पुन्हा नव्याने जागला. विद्यार्थ्यांकडूनही तिच्या अध्यापनाबाबतच्या चांगल्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र, एवढ्यावर थांबायचे नाही, हा तिचा निर्धार कायम होता. मनात जागलेल्या आत्मविश्‍वासाने ती पुन्हा स्पर्धा परीक्षांना भिडली. पुण्यातील यशोवाणी संस्थेकडून ती ऑडिओ बुक्‍स मागवायची. स्वतःच्या साध्या मोबाईलवर ती डाउनलोड करून घ्यायची आणि ते ऐकून अभ्यास करायचा, असा तिचा महाविद्यालयाच्या नोकरीबरोबरचा दिनक्रम सुरू झाला. बॅंकिंग परीक्षेचा तिचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि दोन बॅंकांसाठी तिची निवड झाल्याचे कळताच वेळापुरे परिवार आनंदात न्हाऊन निघाला.

रजनीगंधा सांगते...
 कितीही संकटं येवोत डगमगायचे नाही. 
 ‘मी जिंकू शकते’ हा आत्मविश्‍वास यश मिळवून देतोच.
 एका टप्प्यावर निराशा जरूर येतेच. पण, त्याचवेळी प्रोत्साहन देणारे हातही भेटतात.
 यश मिळाल्यानंतर मात्र आपल्याला आजवर मदत केलेल्यांना कधीच विसरू नका. त्यांच्या प्रती कृतज्ञ राहा.

व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक करा 
www.facebook.com/kolhapursakal

Web Title: rajnigandha velapure success job