पुनर्विवाहास जकातवाडीचा अनोखा आहेर

Marriage
Marriage

सातारा - पतीचे निधन झाल्याने उभे आयुष्य उपेक्षितपणाचे जिणे जगावे लागते, तर लग्न होत नसल्याने नैराश्‍य आल्याने युवक मृत्यूला कवटाळत असल्याच्या घटना घडतात. यातून सामाजिक जीवन उद्‌ध्वस्त होत असते. त्याला उत्तर राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले यांनी दिले. तोच वसा जकातवाडी (ता. सातारा) ग्रामपंचायतीने उचलला आहे. गावातील ज्या विधवा तरुणी अविवाहित तरुणाशी पुनर्विवाह करतील, त्यांना २० हजारांची आर्थिक मदत करण्याचा पुरोगामी निर्णय ग्रामसभेत घेतला. 

जकातवाडी ग्रामपंचायत सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर शपथविधीचा कार्यक्रम, कवितेचे गाव उपक्रम, मानसमित्र समुपदेशन केंद्राची स्थापना आदी विविध सामाजिक उपक्रम राबवून या ग्रामपंचायतीने वेगळा ठसा उमटविला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत पुरोगामी विचारांचा निर्णय घेऊन ग्रामपंचायतीने इतरांना आदर्श घालून दिला आहे. 

या ग्रामसभेमध्ये महिला व पुरुष यांची लोकसंख्येच्या प्रमाणावर चर्चा झाली. हे प्रमाण विषम असल्यामुळे तरुणांच्या विवाहाचा प्रश्न किचकट बनला आहे. तसेच वाढते अपघात व कर्करोग, हृदयरोग अशा आजारांनी युवकांना येणारे मृत्यू यामुळे तरुण वयात विवाहिता विधवा होत आहेत. परिणामी, संपूर्ण आयुष्य एकटेपणाने जगण्याची वेळ तिच्यावर येत असते. समाजात तिला अपमानितपणे जगण्याचीही वेळ येत असते. या चक्रातून तरुण विधवांची सुटका व्हावी, यासाठी ज्या विधवा तरुणी अविवाहित तरुणांशी पुनर्विवाह करतील, त्यांना विवाहासाठी ग्रामपंचायतीकडून २० हजार रुपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थ राजेश भोसले, धनराज दवंडे आदींनी केली. त्याला एकमुखी पाठिंबा देत तसा ठरावच ग्रामसभेने घेतला. यासाठी महिला व बालकल्याणसाठी तरतूद असलेल्या दहा टक्‍के ग्रामनिधीतून मदत दिली जाणार आहे. ग्रामसभेस उपसरपंच हनुमंत भोसले, ग्रामपंचायत सदस्य सखुबाई देशमुख, सोनाली शिंदे, बिस्मिल्ला शेख, ग्रामसेवक यशवंत धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

विधवांना पुनर्विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय जकातवाडी ग्रामपंचायतीने घेतला. बहुदा जकातवाडी ही अशा प्रकारची देशातील पहिली ग्रामपंचायत असावी. अशा महिलांचे, त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले जाणार आहे.
- चंद्रकांत सणस, सरपंच, जकातवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com