सोनसंधीला कलारंगांचा साज चढवलाय तो धनकवडीतील रेवती शिंदे तरुणीनं

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

लॉकडाउनमुळे घरात बसून कंटाळलेल्या मुलांनाही रेवती या कलेचे धडे देत आहे.रेवतीने या कलेचे कुठल्या शाळेत शिक्षण घेतले नाही,की कुठला क्‍लास लावला नाही.तिच्यात दडलेला कलाकार अंगभूतच आहे,असे तिची आई सांगते

पुणे - लॉकडाउनमुळे मिळालेल्या वेळेच्या सोनसंधीला कलारंगांचा साज चढवलाय तो धनकवडीतील रेवती शिंदे या तरुणीनं. घरात बसून राहण्याची सक्ती न मानता आपल्यातील अंगभूत कलेची भक्ती करीत या काळात तिनं विविध कलात्मक वस्तूंची निर्मिती केली. पेपर आणि प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनविलेल्या या वस्तू पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडताहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून रेवती नुकतीच नोकरीला लागली; पण त्याचवेळी लॉकडाउन सुरू झाला. त्यामुळे ऑफीसही बंद. आता घरात बसून करायचं काय, असा प्रश्‍न तिच्यापुढे ठाकला. त्याचवेळी तिच्यात दडलेला कलाकार जागा झाला. तिने रद्दीतील पेपर, खराब झालेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा केल्या. रंग, ब्रशसह वस्तू बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव केली. त्यासाठी तिने यू-ट्यूबचाही आधार घेतला. त्यातून तिने विविध प्रकारचे रोबो, बाहुल्या, फुलदाण्या, सायकल, बैलगाडी आदी प्रकारच्या देखण्या कलाकृती साकारल्या. या वस्तू जसजशा साकारत गेल्या तसतसा तिच्यातील आत्मविश्‍वास दुणावत गेला. त्यातून तिने ही कला जोपासण्याचा निर्धार केलाय. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रेवतीने या कलेचे कुठल्या शाळेत शिक्षण घेतले नाही, की कुठला क्‍लास लावला नाही. तिच्यात दडलेला कलाकार अंगभूतच आहे, असे तिची आई सांगते. 

मुलांनाही कलेचे धडे 
लॉकडाउनमुळे घरात बसून कंटाळलेल्या मुलांनाही रेवती या कलेचे धडे देत आहे. तिच्या घरात रोजच हा कला वर्ग भरत आहे. शेजारची मुले आवर्जून या वर्गात येत असून, कलेचे धडे घेत आहेत. "सोशल डिस्टन्सिंग'चा नियम पाळून हा कला आणि रंगांचा हा वर्ग रंगत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revati Shinde from Dhankawadi good use of time due to lockdown