अवयवदानातून चिमुकलीचा आदर्श

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

देवरी (जि. गोंदिया) - चिमुकली मुलगी अपघातात गंभीर जखमी झाली. सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत तिने अखेर शुक्रवारी जगाचा निरोप घेतला. दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही आईवडिलांनी तिचे अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला.

देवरी येथील ब्लॉसम पब्लिक स्कूलमध्ये सीनियर केजीमध्ये शिकत असलेली रिव्यानी राधेश्‍याम रहांगडाले (वय 5) ही मामासोबत दुचाकीवरून जात असताना 19 एप्रिलला अपघात झाला. अपघातात तिच्या डोक्‍याला जबर दुखापत झाली. तिला नागपूर येथे हलविण्यात आले. रिव्यानी सात दिवस मृत्यूशी झुंज देत होती. अखेर आज तिला मृत घोषित करण्यात आले. तिचे वडील देवरी येथे पोलिस विभागात असून, आई गृहिणी आहे.

मुलीच्या अवयवदानामुळे कुणाला तरी जग बघता येईल, या भावनेने रिव्यानीचे आईवडील आणि कुटुंबीयाने तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. तिचे हृदय मुंबई येथील दोन वर्षांच्या मुलीला, मूत्रपिंड चेन्नई येथे, तर डोळे, फुफ्फुसाचे प्रत्यारोपण नागपूर येथील वेगवेगळ्या रुग्णांवर करण्यात येणार आहेत. शाळेत अत्यंत हुशार असणाऱ्या रिव्यानीने यावर्षी पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये अवयवदानाचा संदेश दिलेला होता. तिच्यावर शनिवारी (ता. 28) मूळ गावी भजियापार (आमगाव रेल्वेक्रॉसिंग) येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Web Title: Rivyani-Rahangadale organ donate motivation