"बुलेट राजां'नी घडविले माणुसकीचे दर्शन ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पुणे - अप्पर-इंदिरानगर येथील फळविक्रेते भीमाशंकर कुंभार यांची हातगाडी "गायब' करणारे महापालिकेच्या निगरगट्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा "हा प्रकार आमच्या हद्दीत घडला नाही' असे सांगत त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु या प्रकारामुळे हतबल झालेल्या कुंभार यांच्या हृदयातील वेदना काही तरुणांनी जाणली. "रॉयल बुलेटीअर्स पुणे'च्या "बाईकर्स'ने नवी कोरी हातगाडी बनवून ती रविवारी त्यांच्या पत्नी व मुलाकडे सोपविली. त्यामुळे त्यांच्या संसाराची गाडी पुन्हा एकदा रुळावर आली. 

बिबवेवाडी व अप्पर-इंदिरानगर परिसरात हातगाडीवर फळविक्री करणाऱ्या कुंभार यांच्या हातगाडीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर जप्त केलेली हातगाडी कात्रजच्या गोडाऊनमध्ये ठेवली. हातगाडीवरच पोट असल्यामुळे ती चटकन सोडवून आणण्यासाठी कुंभार यांनी पाचशे रुपयांची दंडाची पावती फाडली. त्यानंतर निगरगट्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचा मानसिक छळ केला. शेवटी "अशी हातगाडी इथे आलीच नाही' असे उत्तर दिले. याबाबतचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले. त्यानंतर "हा प्रकार दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत झाला आहे' अशी उडवाउडवीची उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली. 

दरम्यान, "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल "रॉयल बुलेटीअर्स पुणे'च्या बाईकर्सनी घेतली. विधायक कामांसाठी जमा केलेल्या रकमेतून या तरुणांनी नवीन हातगाडी बनवली. रविवारी या हातगाडीची पूजा करून कुंभार यांच्या पत्नी अनिता व मुलगा आनंद यांच्याकडे ती सोपविली. या वेळी सचिन घेवारे, गजानन सरकाळे, अभिजित पवार, अमर जाधव, तुषार साळी, अमित दिघे, गुरू पाटील, अमित पाटील व अमोल रासकर आदी "बाईकर्स' उपस्थित होते. 

काय आहे "रॉयल बुलेटीअर्स'? 
"रॉयल बुलेट' ही दुचाकी वापरणाऱ्या 65 तरुणांचा हा ग्रुप आहे. ते दर महिन्याला "राईड'च्या निमित्ताने एकत्र येतात. गडकोट-किल्ल्यांची स्वच्छता, अनाथालये, दृष्टिहीनांच्या वाद्यवृंदासाठी वाद्य देण्यापासून ते सामाजिक प्रश्‍नांवर जागृती करण्याचे काम हा ग्रुप निधी उभारून करत आहे. ग्रुपच्या प्रकाश भिलारे व केतन आढाव यांनी 22 तासांत 1650 किलोमीटरचे अंतर पार करण्याची स्पर्धाही जिंकलेली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Royal buletiars group

टॅग्स