#SaluteBravery निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने वाचविले चौघांचे प्राण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

पुणे - एका विवाहितेने आपल्या तीन मुलांसह कालव्यामध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, एक निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने पाण्यात उडी मारून चौघांचेही प्राण वाचविले. ही घटना बी. टी. कवडे रस्ता परिसरात शनिवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास घडली.

पुणे - एका विवाहितेने आपल्या तीन मुलांसह कालव्यामध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, एक निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने पाण्यात उडी मारून चौघांचेही प्राण वाचविले. ही घटना बी. टी. कवडे रस्ता परिसरात शनिवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास घडली.

मेजर (निवृत्त) सुरेश भोसले हे खासगी कामानिमित्त बी. टी. कवडे रस्त्यावरील कालव्यालगतच्या रस्त्याने जात होते. त्या वेळी त्यांना एक महिला कालव्याजवळ दिसली. काही कळण्यापूर्वीच तिने सहा महिन्यांचे बाळ, सहा व आठ वर्षांच्या मुलाला बरोबर घेऊन पाण्यात उडी मारली. हा प्रसंग पाहिल्यानंतर भोसले यांना धक्काच बसला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत थेट पाण्यात उडी मारून पहिल्यांदा तान्ह्या बाळास वाचविले.

त्यानंतर दोन्ही मुलांना हाताला धरून पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान, लष्करातील नायक सतीश गुंजाळ व विद्यार्थी अमित रावळ त्यांनी भोसले यांची धडपड पाहिली अन तेही तत्काळ त्यांच्या मदतीला धावून आले. पाण्याला भरपूर वेग असल्याने संबंधित महिला बुडू लागली होती. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या भोसले यांना तिने मिठी मारली. त्यामुळे दोघेही बुडण्याची शक्‍यता होती. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी महिलेच्या केसांना धरून उलटे पोहत बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, आव्हान त्यांची पाठ सोडत नव्हते. कारण, त्यांना झाडाझुडपांचाही आधार मिळेना, अखेर मुरमाच्या खडकाचा आधार घेत ते कडेला पोचले. तेथे महिलेच्या पोटातील पाणी त्यांनी बाहेर काढले. दरम्यान, गुंजाळ व रावळ यांनी दोघांनाही बाहेर काढले. महिला शुद्धीवर आल्यानंतर तिघांनाही ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविले.  

माणुसकी झाली बोथट
दरम्यान, ही घटना पाहण्यासाठी हजारो नागरिक रस्त्याकडेला थांबले होते. मात्र, त्यापैकी एकानेही पाण्यात उतरण्याचे धाडस दाखविले नाही. त्याहीपलीकडे भोसले यांनी नागरिकांना त्यांच्याकडील कपड्यांची रस्सी करायला सांगितली. त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या घटनेच्या निमित्ताने एका बाजूला प्राण पणाला लावून जीव वाचविणारा, तर दुसऱ्या बाजूला माणुसकी किती बोथट होऊ शकते, असे परस्परविरोधी चित्र दिसून आले.

आम्हाला देशाची सेवा करतानाच, माणसांचा जीवही वाचवायला लष्कराने शिकविले आहे. मग माझ्या डोळ्यांदेखत चौघांचा जीव मी कसा जाऊ देईन? अशी वेळ तुमच्यावरही येईल, तेव्हा कोण वाचवेल? त्यामुळे बघ्यांच्या गर्दीने माणुसकी दाखवावी. फक्त फोटो, व्हिडिओ काढून देशसेवा होत नाही. इथे स्वतःला झोकून द्यावे लागते. ते मी केले, इट्‌स माय ड्युटी.
-  सुरेश भोसले, मेजर (निवृत्त)

Web Title: #SaluteBravery 4 people life saving by retired army officer