विज्ञानाच्या वाटेवरील फकीर!

कुणाल लोंढे - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

१२६ कोटी लोकसंख्येच्या या देशात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात. प्रत्येकाला आपला देव आणि धर्मच खरा आहे असे वाटते. अशा मानसिकतेमुळे क्रांतिकारकांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळालेला हा देश पुन्हा पारतंत्र्यात जाईल. सुशिक्षित माणसालाही हे कळत नाही याची मला लाज वाटते. म्हणूनच विज्ञानातून समाजप्रबोधनाचे काम मी करतो आहे.
- संतोष टकले, वरिष्ठ शास्त्रज्ञ, बीएआरसी

पनवेल - भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये (बीएआरसी) वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने इतरांप्रमाणे कावळा-चिमणीचा संसार न थाटता पदरमोड करून विज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी खर्च करण्याचे व्रत घेतले आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून देशाच्या स्वातंत्र्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण गावातील हा सुपुत्र आहे. संतोष टकले असे त्याचे नाव आहे. केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात तो पायाला भिंगरी लावून फिरतो आहे.

कुणाकडूनही एका पैशाचे मानधन न घेता, कुणाच्या निमंत्रणाची वाट न पाहता त्याने आजवर विज्ञानाविषयी तब्बल एक हजार ७५० व्याख्याने दिली आहेत.

संतोष टकले यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून ‘बी टेक.’ केले आहे. पदव्युत्तर शिक्षण न्युक्‍लिअर इंजिनिअरिंगमधून पूर्ण केले आहे. जाती-धर्माच्या जोखडाखाली अडकलेल्या समाजाला संत गाडगेबाबांनी ज्या तळमळीने जागृत केले, त्याच निष्ठेने विज्ञानातून समाजप्रबोधन करण्याचे व्रत त्यांनी अंगीकारले आहे. विश्‍वाचे अंतरंग, अणुतंत्रज्ञान, उत्क्रांती, पृथ्वीची निर्मिती, प्राचीन भारतीय खगोलशास्त्र, वैज्ञानिक आणि महत्त्वाचे शोध या विषयांवर ते व्याख्याने देतात. अजिबात गाजावाजा न करता त्यांचे हे कार्य सुरू आहे.

दोन वर्षांपूर्वी त्यांनी शाळांशी संपर्क साधून व्याख्याने द्यायला सुरुवात केली. कोकणातून निघालेला हा ध्येयवेडा जीव पाहता पाहता राज्यभरात पोहचला. प्रवास, राहणे, खाणे हा सगळा खर्च ते आपल्याच खिशातून करतात. जिभेचे फारसे चोचले न पुरवता या समाजाची ज्ञानविषयक भूक भागवतात. या जगावेगळ्या पतीचे पत्नी वैशाली यांनाही कौतुक आहे. जगाचा संसार करणाऱ्या या ध्येयवेड्याचा प्रपंच त्याही जमेल तितक्‍या काटकसरीने सांभाळतात. आजवर व्याख्यानासाठी त्यांनी १० लाखांहून अधिक खर्च केला आहे. टकले चॅरिटेबल ट्रस्ट, टकले विज्ञान गुरुकुल या संस्थांद्वारे ते अनेक उपक्रम राबवतात. महाराष्ट्राबरोबरच गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, ओडिशा, कर्नाटक आदी राज्यांतही त्यांची भ्रमंती सुरू असते.

१२६ कोटी लोकसंख्येच्या या देशात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात. प्रत्येकाला आपला देव आणि धर्मच खरा आहे असे वाटते. अशा मानसिकतेमुळे क्रांतिकारकांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळालेला हा देश पुन्हा पारतंत्र्यात जाईल. सुशिक्षित माणसालाही हे कळत नाही याची मला लाज वाटते. म्हणूनच विज्ञानातून समाजप्रबोधनाचे काम मी करतो आहे.
- संतोष टकले, वरिष्ठ शास्त्रज्ञ, बीएआरसी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: santosh takle