अंधत्वाच्या वाटचालीला जिद्दीची ‘दृष्टी’

अंधत्वाच्या वाटचालीला जिद्दीची ‘दृष्टी’

कोरेगाव - तो तसा जन्मतः पूर्ण अंध. पण, जात्याच हुशार. अंधाऱ्या आयुष्यात पांढऱ्या काठीच्या साथीने त्याने वाटचाल केली. ‘डीएड’ पर्यंत शिक्षण घेतले. तरीही नोकरी नव्हती म्हणून तो रडत बसला नाही. चार वर्षे खेड्यापाड्यात फिरून शाळांना खडू विकून त्याने आपल्या चरितार्थासाठी कुटुंबाला मदत केली. नोकरीही लागली पण तो आपल्या अंध बांधवांना विसरला नाही. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला संतोष यादव अंधांसाठी निरपेक्षपणे कार्य करत असून, त्यांच्या जिद्दीला डोळसही सलाम करत आहेत.

कऱ्हाड तालुक्‍यातील शिरगाव हे संतोष यादव यांचे मूळ गाव. जन्मापासूनच त्यांना दृष्टी नाही. मात्र, ते लहानपणापासूनच हुशार होते. आई घरकाम करणारी तर वडील गावच्या सेवा सोसायटीत काम करत होते. घरी थोडी शेती होती. गावच्या शाळेत त्यांना अंधत्वामुळे जाता आले नाही. एका सामान्य माणसाच्या ओळखीमुळे त्यांना वयाच्या सहाव्या वर्षी पुणे येथील  कोरेगाव पार्कमधील अंधशाळेत प्राथमिक शिक्षणाची संधी मिळाली. संतोष जिद्दीने अभ्यास करत राहिले. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण तेथे झाल्यावर इंदोली येथील शाळेत त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. फक्त शिक्षकांचे शिकवणे ऐकून ‘रायटर’च्या साह्याने पेपर लिहून त्यांनी बारावीच्या परीक्षेमध्ये ६५ टक्के गुण मिळविले. पुन्हा पुण्यात जाऊन ब्लाईंड डीएड शिक्षण घेतले. गावी येऊन नोकरीचा खूप प्रयत्न केला; पण कोठे नोकरी मिळत नव्हती. अंधांसाठी असलेला तीन टक्के कोटा कोणीच भरत नव्हते. साताऱ्यातील अंधांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या हेमा सोनी आणि सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी आंदोलने केली. शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजविल्या. अखेर राखीव कोटयातून संतोष यादव यांना साताऱ्यातील दस्त नोंदणी कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी मिळाली. पुढे कोल्हापूर जिल्ह्यातील काहीशा अंध असलेल्या गीतांजली यांच्याशी विवाह झाला. गोजीरवाणी मुलगी, मुलगा झाला. प्रयत्न आणि दैवाने दिलेल्या साथीने सारे काही व्यवस्थित झाले. तरीही संतोष स्वतः समाधानी नव्हते. स्वतःचे सारेकाही चांगले झाले म्हणून ते गप्प बसलेले नाहीत. जिल्ह्यातील आपल्या अंध सहकाऱ्यांचेही चांगले पुनर्वसन झाले पाहिजे, हा विचार त्यांना आजही गप्प बसू देत नाही. त्यांनी अंध बांधवांची संघटना बांधली. अंध, अपंग विकास संघाच्या महासचिवपदी ते नि:स्वार्थीपणे काम करत आहेत. शासन दरबारी अंधांना नोकऱ्या, स्वयंरोजगार मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. एवढेच नव्हे तर ‘नॅब’ने दिलेल्या वाद्यांतून त्यांनी अंधांचा ‘ऑर्केस्ट्रा’ उभारला असून, त्यातून ते अंधांच्या रोजीरोटीसाठी धडपडत आहेत. त्यांच्या या धडपडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सर्व अंधांना शासन नोकऱ्या देऊ शकत नसेल, तर किमान त्यांना शासनाने स्वयंरोजगारासाठी मदत केली पाहिजे. पण तसे होत नाही. शासनाने अंधांच्या पुनर्वसनाचा आराखडा केला पाहिजे. त्यांना व्यवसायासाठी जागा, अर्थसाह्य सहज उपलब्ध करून दिले पाहिजे. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. अंधांसाठी अर्थसाह्याच्या योजना आहेत; पण कागदपत्रे जमविण्याचे काम अतिशय किचकट आहे. कागदपत्रे पूर्ण केलीच तर बॅंका अंधांना कर्ज देण्यात टाळाटाळ करतात. जीवनात उभे राहायला मदत करणे सोडाच, कर्जासाठी उभेही करत नाहीत. कमीत कमी कागदपत्रांत अंधांना अर्थसाह्य उपलब्ध करण्याची गरज आहे.
-संतोष यादव, सातारा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com