सरपंचाच्या हातून घडताहेत विद्यार्थी 

देवेंद्र रामटेके 
रविवार, 5 ऑगस्ट 2018

आसोली (जि. गोंदिया) - ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येत असलेल्या सर्वच प्रशासकीय कामांचे नियोजन करणे, गावातील सर्व समस्या मार्गी लावणे असे महत्त्वाचे कार्य असलेला जनतेचा प्रतिनिधी म्हणजे सरपंच. गावची सर्व जबाबदारी पार पाडताना गावातील विद्यार्थी सुशिक्षित व्हावे, गावाचा लौकिक व्हावा, म्हणून गावातील विद्यार्थ्यांचे मोफत शिकवणीवर्ग घेऊन ज्ञानार्जन करण्याचे कार्य नवरगावखुर्द येथील सरपंच नमिता दीपक तेढहा करीत आहेत.

मागील वर्षी पार पडलेल्या निवडणुकीत नमिता तेढहा सरपंच म्हणून निवडून आल्या. गावाचा विकास करण्यासोबतच सामाजिक कार्य करण्याची त्यांना आवड आहे. उच्चशिक्षित होऊन शिक्षक होण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, ते पूर्ण होऊ शकले नाही. हेच शल्य त्यांना नेहमी बोचत राहिले. आपली आवड पूर्ण व्हावी, आपल्या हातून विद्यार्थी घडावेत, म्हणून त्यांनी गावातील विद्यार्थ्यांचे स्वतःच्या घरीच मोफत शिकवणी घेणे सुरू केले. मागील आठ वर्षांपासून त्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे अविरत देत आहेत. त्यांचे शिकवणी वर्ग सकाळी सहा वाजतापासून सुरू होतात. सध्या त्यांच्याकडे गावातील चाळीस विद्यार्थी शिकवणीकरिता येत आहेत. आठ वर्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.   

त्यांचा सन्मान म्हणून गावकऱ्यांनी त्यांना निवडणुकीत विजयी करून सरपंच पदावर आरूढ केले. सरपंच झाल्यानंतर त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या. ग्रामपंचायतीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्या ध्येयाला न विसरता शिकवणीवर्ग घेण्याचे कार्य त्यांनी अविरत सुरू ठेवले आहे. कुटुंबातील नऊ सदस्यांना सांभाळून त्या आपले कार्य सक्षमपणे पार पाडत आहेत. गावातील विविध विकास योजना, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या विषयातही गावाला अव्वल करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्या मुळच्या अकोला जिल्ह्यातील असून, त्यांनी अमरावती विद्यापीठातून सीईटी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त केले. आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा गावकऱ्यांना व्हावा व त्यातून आदर्श, भ्रष्टाचारमुक्‍त, पारदर्शक ग्रामविकास घडावा. आपल्या लहानशा गावाचे नाव संपूर्ण राज्यभर व्हावे असे स्वप्न उराशी बाळगून त्या निरंतर कार्य करीत आहेत.

गावातील नागरिकांच्या आशीर्वादाने मला राजयोगाची संधी प्राप्त झाली. आपल्या गावाचा संपूर्ण राज्यात नावलौकिक व्हावा, हेच आपले ध्येय आहे. आपल्या सर्व कार्यात ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गावातील नागरिक मला सहकार्य करतात. 
- नमिता तेढहा,  सरपंच, नवरगावखुर्द.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch take Free Tutorials for Students