एकीचे बळ : ग्रामस्थांनीच ऑक्‍सिजन मशिन आणल्या; गरजूंना मोफत सेवा

जयंत पाटील
Thursday, 3 September 2020

सकाळी व्हॉट्‌सऍप ग्रुपवरून केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांकडून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

कोपर्डे हवेली (जि.सातारा) : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड व ऑक्‍सिजनची कमतरता भासत असल्याने अनेकांचा बळी जात आहे. या पार्श्वभूमीवर कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावच्या हितासाठी लोकसहभागातून दोन ऑक्‍सिजन मशिन खरेदी केल्या आहेत. 

आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. ग्रामीण भागातूनही रुग्णसंख्या वाढल्यामुळे प्रशासन, आरोग्य विभागावर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर कोपर्डे हवेलीतील ग्रामस्थांनी भविष्यातील धोका ओळखून तो काही प्रमाणात कमी करण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवक, गणेश मंडळे, पुणे-मुंबईस्थित युवकांनी व्हॉट्‌सऍप ग्रुपवर एकत्र येऊन ऑक्‍सिजन मशिन खरेदीसाठी स्वेच्छेने लोकवर्गणी देण्याचे आवाहन केले होते.

आईनेच दिली मुलाच्या खुनाची सुपारी; दोघांना अटक  

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला व केवळ 12 तासांतच दोन ऑक्‍सिजन मशिन खरेदी देखील केल्या. या मशिन कोपर्डे हवेलीतील गरजू रुग्णांना गरजेच्यावेळी मोफत देण्यात येणार आहेत. अजूनही देणगीदारांचा ओघ सुरू असून अजून एक ते दोन ऑक्‍सिजन मशिन खरेदी करण्यात येणार आहेत. कोपर्डे हवेली ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीचे परिसरातून कौतुक होत आहे.

ही सातारकारांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी  

सकाळी व्हॉट्‌सऍप ग्रुपवरून केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांकडून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला व दोन ऑक्‍सिजन मशिनच्या किमतीची रक्कम जमादेखील झाली व ऑक्‍सिजन मशिन खरेदी करण्यात आल्या. मदतीचा ओघ सुरूच असून, जमा होणाऱ्या रकमेतून आणखी ऑक्‍सिजन मशिन खरेदी करण्यात येणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Koparde Haveli Villagers Donated Orygen Machine