जिद्दीच्या जोरावर यशस्वी केले शेळीपालन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

समस्यांवर जिद्दीने मात करत शेतीपूरक उद्योग चांगल्या प्रकारे करता येत असल्याचे शिंदेवाडी (जि. सातारा) येथील द्वारका यशवंत शिंदे यांनी दाखवून दिले आहे. शिंदेवाडीसारख्या दुर्गम भागात द्वारका शिंदे यांनी कुटुंबाच्या सहकार्याने गेल्या तीन वर्षांपासून शेळीपालनातून आर्थिक स्थिरता मिळविली आहे.
-  विकास जाधव

सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणापासून दोन किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी हे सुमारे ३०० लोकसंख्या असलेले गाव. उरमोडी धरण जवळ असले तरी शेतीला पुरेसे पाणी मिळाले नसल्याने परिसरातील बहुतांशी शेती ही जिरायती. या गावातील द्वारका यशवंत शिंदे या महिला शेतकरी राहतात. जिरायती शेतीतून फारसे उत्पन्न हाती येत नसल्याने त्या आणि त्यांचे पती गेली ३५ वर्षे मुंबई येथे होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पती रिक्षा तर द्वारकाबाई अब्राँडरीचे काम करत होत्या. यातून येणाऱ्या पैशातून खर्च भागावला जात असे. मात्र पुढे पतीचे आजारपण आणि मुले मोठी झाल्यावर त्यांनी मुंबई सोडली. द्वारकाताई पतीसह शिंदेवाडीमध्ये राहण्यास आल्या. घरची तीन एकर शेती, मात्र शाश्वत पाण्याची सोय नसल्याने पावसाच्या पाण्यावरच भात, सोयाबीन, भुईमूग पिकांची लागवड केली जायची. या शेतीबरोबरच पूरक व्यवसाय करावा असे द्वारकाताईंना वाटत होते. यादरम्यान त्यांना बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये आयोजित  शेळीपालनाविषयी प्रशिक्षणात सहभागी होण्याची संधी मिळाली. प्रशिक्षणामुळे चांगल्या प्रकारे शेळीपालन करू शकतो, असा आत्मविश्वास त्यांना आला. त्यामुळे द्वारकाताईंनी शेळीपालनाचा विचार पती आणि मुलांना बोलून दाखवला. घरातून होकार मिळाल्यावर त्यांनी शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला.

शेळीपालनास प्रारंभ 

शेळीपालनाबाबत द्वारका शिंदे म्हणाल्या, की २०१४ मध्ये घरासमोर २० फूट बाय २० फूट आकाराचा गोठा तयार केला. घरातील शिलकीतून एक बोकड आणि दहा उस्मानाबादी शेळ्या दहिवडी येथून ९० हजार रुपयांमध्ये खरेदी केल्या. शिंदेवाडी परिसरात पावसाळ्यात जोरदार पाऊस होत असल्यामुळे शेळ्यांच्या व्यवस्थापनात पहिल्यांदा अडचणी आल्या. वातावरण अनुकूल नसल्यामुळे सुरवातीच्या काळात एक बोकड आणि एक शेळी मरण पावली. मात्र, न खचता मी शेळ्याचे संगोपन सुरू ठेवले. यादरम्यान परळी येथील पशुवैद्यक डॉ. मोरे यांच्या सल्ल्यानुसार शेळ्यांच्या व्यवस्थापनात बदल केला. शिफारशीनुसार शेळ्यांना लसीकरण, खाद्य व्यवस्थापन केल्यामुळे टप्प्याटप्प्याने शेळ्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली.

शेळीपालनाचा विस्तार 

शेळीपालनाच्या विस्ताराबाबत द्वारका शिंदे म्हणाल्या, की मी टप्प्याटप्प्याने शेळ्यांची संख्या वाढवत नेली. शेळ्यांची संख्या वाढल्याने घराच्या उत्तरेस ३० फूट बाय १५ फूट आकाराचा नवीन गोठा बांधला. त्याच्या शेजारी शेळ्यांना फिरण्यासाठी मुक्त संचार गोठा तयार केला. 
बांधिव गोठ्यात शेळ्या निरोगी राहाव्यात तसेच गोठ्यामध्ये घाण होऊ नये, यासाठी शेळ्यांना बसायला गोठ्यात उंच फलाट तयार केले. चाऱ्यासाठी गव्हाण केली. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार शेळ्यांचा आहार आणि आरोग्य व्यवस्थापन ठेवले जाते.
- द्वारका शिंदे, ९६२३६६४२६५     

शेळीपालनातील महत्त्वाच्या बाबी 

दररोज शेळ्या, बोकडांना चार तास चरायला सोडले जाते. यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते. चाऱ्याच्या खर्चात बचत झाली. 
नर करडे सुदृढ होण्यासाठी शेळ्यांची धार न काढता सर्व दूध पाजले जाते. 
स्वतः लसीकरण आणि औषधोपचार. गरजेनुसार पशुतज्ज्ञांचा सल्ला.
गाव डोंगरात असल्याने वन्य प्राण्यांपासून नुकसान होऊ नये यासाठी शेळ्यांचा विमा.
पावसाळ्यात रोग प्रसार होऊ नये यासाठी विशेष काळजी. 
गोठ्याची दररोज स्वच्छता.
सकाळी आणि संध्याकाळी शेळ्यांना पुरेसे खाद्य, पाणी नियोजन.

आरोग्य व्यवस्थापन 
शेळ्यांच्या व्यवस्थापनाबाबत द्वारका शिंदे म्हणाल्या, की पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने चाऱ्याच्या बरोबरीने सकाळी आणि संध्याकाळी पेंड दिली जाते. दुपारी एक ते संध्याकाळी सहा या कालावधीत सर्व शेळ्या चरावयास नेल्या जातात. शेळ्यांना डोंगरात चरण्यासाठी न सोडता आम्ही स्वतःच्या शेतातच सोडतो. शेळ्या चारणे आणि गोठ्याच्या व्यवस्थापनात पतीची चांगली मदत होते. गाव दुर्गम असल्याने प्रत्येकवेळी पशुतज्ज्ञाला बोलावणे शक्य होत नाही. त्यामुळे मी स्वतः शेळ्यांना लसीकरण कसे करायचे ते शिकून घेतले. शेळी किंवा बोकडास हालचालीवरून काय होत असेल याचा अंदाज आम्हाला येऊ लागला आहे.   शेळ्यांच्या व्यवस्थापनासाठी आम्हाला डॉ. मोरे आणि कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे चांगले सहकार्य मिळते. येत्या काळात आरे गावात शंभर शेळ्यांच्या संगोपनाच्यादृष्टीने गोठ्याची उभारणी करण्याचे नियोजन केले आहे. शेळीपालन वाढविण्यासाठी मुलांचीही मदत मिळत आहे.  

विक्रीचे नियोजन 
शेळ्यांच्या विक्रीबाबत शिंदे म्हणाल्या, की सन २०१५ मध्ये मी बारा बोकडांची विक्री केली. यातून ७० हजार रुपये मिळाले. सन २०१६ मध्ये पाच शेळ्या आणि अकरा बोकडांची विक्री केली. यातून सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. सध्या १८ शेळ्या, १८ बोकड आणि दहा लहान कोकरे आहेत. ईदला बोकड विक्री करणार आहे. या वर्षी बोकडांच्या विक्रीतून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. गोठ्यातील लेंडीखत स्वतःच्या शेतीमध्ये वापरतो. शिल्लक लेंडीखतातून गेल्या वर्षी पंधरा हजार मिळाले. या लेंडीखताला परिसरातील शेतकऱ्यांडून चांगली मागणी आहे.

Web Title: satara news success in goat rearing