अपशिंगे (मिल्ट्री, ता. सातारा) - येथील जिल्हा परिषद शाळा.
अपशिंगे (मिल्ट्री, ता. सातारा) - येथील जिल्हा परिषद शाळा.

इथे घडती वीर जवान

११४ वर्षांची यशस्वी परंपरा; लोकसहभागाचा आदर्श

सातारा - सातारा तालुक्‍यातील अपशिंगे गावाचे नाव पुढे येताच ‘मिल्ट्री’हा शब्दही जोडून येतोच... ही परंपरा उभी करण्याचा पाया मजबूत करणारी येथील जिल्हा परिषद शाळा ११४ वर्षांची झाली... तिने अनेक संकटे झेलली. पटसंख्या घसरली, तुकड्या कमी झाल्या, शिक्षकही कमी झाले...पण, तितक्‍यातून ती नुसती सावरली नाही, तर गरुडभरारी घेत आहे. 

सैनिकी परंपरा असलेल्या मिल्ट्री अपशिंगे येथे १९०३ मध्ये जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली. सुरवातीला पहिली ते चौथीपर्यंत शाळा अन्‌ प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्या होत्या. पुढे सातवीपर्यंत शाळा सुरू झाली. परंतु, रयत शिक्षण संस्थेची शाळा सुरू झाल्यानंतर हळहळू इयत्ता चौथीपर्यंत झेडपी शाळेची अधोगती होऊन दोन ऐवजी एक-एक तुकड्या झाल्या. पटसंख्याही १५० राहिली. तत्कालिन मुख्याध्यापक जयसिंग गुजर यांनी शाळेचे बाह्यांग सुधारण्यावर भर देत लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांच्या सहकार्यातून संरक्षक भिंत, बाग-बगीचा केला. त्यात औषधी वनस्पतींसह नारळाची १०० झाडे लावली. पुढे मुख्याध्यापक रमेश निकम यांनी गुणवत्तेवर भर दिला. २०१० मध्ये होतकरू शिक्षकांची साथ मिळाली. २०११ मध्ये इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चार मुलांनी यश मिळविले अन्‌ तेथून प्रगतीचा श्रीगणेशा झाला. डिजिटल क्‍लासरूम, पाचवी ते सातवीपर्यंत वर्ग वाढविणे, शाळेची अंतर्बाह्य रंगरंगोटी, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, लोकसहभाग याचा आराखडा तयार केला गेला. आयडीबीआय बॅंकेने साडेसहा लाख रुपयांची शौचालये बांधून दिली.

२०११ ते २०१७ अखेर शाळेस सहा लाखांची आर्थिक मदत लोकसहभागातून झाली. शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा निवड, क्रीडा प्रबोधिनी आदी परीक्षांत २० विद्यार्थ्यांनी यश मिळविले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमात शाळासिद्धी स्पर्धेसाठी शाळेची निवड झाली. २०१४-१५, २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून २० मुलांनी या शाळेत प्रवेश घेतले. 

पूर्वाश्रमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी शाळेला भेट देऊन मुलांशी संवाद साधला होता. त्यावेळी ‘मला जर मूल असते, तर त्याला या शाळेत घालायला मला आवडले असते,’ असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. 

...हे गवसले
२०१६ मध्ये आयएसओ मानांकन
१७० वरून पटसंख्या २७३ वर
शिक्षक संख्या पाच वरून नऊ 
तीन एलसीडी प्रोजेक्‍टर, तीन टॅब
चार वर्ग बनले डिजिटल वर्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com