साताऱ्यात उभी राहतेय माणुसकीची भिंत!

विशाल पाटील - @vishalrajsakal
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

सातारा - रस्त्याकडेला थंडीने कुडकुडणारे... अंगावर पुरेसे कपडे नसलेले... लहानग्यांना खेळण्यासही साहित्य नसलेले... शिकण्यासाठी वही-पेनही नाहीत... असे अनेक जण येता-जाता दिसतात आणि मनात काहूर माजते... मदतीची भावना जागृत होते... आता तुम्हाला या सर्वांना मदत करणे सहज शक्‍य आहे. कारण, साताऱ्यातही आता ‘माणुसकीची भिंत’ उभी राहात आहेत. 

सातारा - रस्त्याकडेला थंडीने कुडकुडणारे... अंगावर पुरेसे कपडे नसलेले... लहानग्यांना खेळण्यासही साहित्य नसलेले... शिकण्यासाठी वही-पेनही नाहीत... असे अनेक जण येता-जाता दिसतात आणि मनात काहूर माजते... मदतीची भावना जागृत होते... आता तुम्हाला या सर्वांना मदत करणे सहज शक्‍य आहे. कारण, साताऱ्यातही आता ‘माणुसकीची भिंत’ उभी राहात आहेत. 

राजस्थानमध्ये एका संवेदनशील माणसाने ‘नेकी की दिवार’ हा अद्‌भुत प्रयोग सुरू केला. जे-जे आपणाकडे निरुपयोगी आहे; परंतु सुस्थितीत आहे, ज्या वस्तूच्या देण्याने कोणाची तरी गरज भागणार आहे, ती वस्तू एका भिंतीवर लटकावायची. ज्याला गरज आहे तो घेऊन जाईल, ही प्रयोगातील पद्धत साधारण असली तरी त्यातून असामान्य अशी माणुसकीची भिंत उभी राहिली. राज्यातही अकोला, पुणे, कोल्हापूर, नागपूरसह अनेक मोठ्या शहरांमध्ये संकल्पना राबविली गेली. त्यास प्रतिसादही लाभला. 

साताऱ्यातही ही संकल्पना साकारत आहे. जिल्हा परिषद मैदानावर सकाळी व्यायामासाठी येणारे वात्सल्य फाउंडेशन आणि हॅप्पी पिपल सामाजिक संस्थेच्या सुमारे १०० सदस्यांनी एकत्रित येवून ‘जिल्हा परिषद मॉर्निंग ग्रुप’ निर्माण केला आहे. याच ग्रुपने पुढाकार घेत ही संकल्पना ता. २० डिसेंबरपासून दर मंगळवारी राबविण्याचा मानस व्यक्‍त केला आहे. वस्तू वेगवेगळ्या करणे, त्याचे योग्यरित्या वितरण होण्यासाठी या ग्रुपमधील स्वयंसेवक दर मंगळवारी तेथे थांबणार आहेत. या उपक्रमातून सातारकरांनाही आपली समाजासाठी असलेली सामाजिक बांधिलकी जोपासता येणार आहे.

दाखवा माणुसकी...!
‘ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांनी द्यावे, नसेल त्यांनी घेऊन जावे,’ ही संकल्पना पुढे करत दर मंगळवारी माणुसकीची भिंत उभारली जाणार आहे. त्यात आपल्याकडे असलेले कपडे, स्वेटर्स, कानटोप्या, हातमोजे, चादरी, ब्लॅंकेट्‌स, चपला, बूट, खास करून लहान मुलांची खेळणी आणि कपडे, गरम कपडे द्यावेत. ‘वेदना वाटून घेऊ आणि सहवेदनेचा नवा अध्याय सुरू करू,’ यासाठी सातारकरांनी माणुसकी दाखवावी, असे आवाहन केले आहे. इच्छुकांसाठी संपर्क ः शशिकांत पवार (मो. ९१५८००६३३३).

ज्यांना मदत घेवून येणे शक्‍य नाही, त्यांच्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक सुरू केला जाईल. त्या माध्यमातून या पुढे घरोघरी जावूनही वस्तूंचे संकलन केले जाईल. महाविद्यालय, शहरातील मुख्य चौकांत या उपक्रमाची प्रसिद्धी केली जाईल. स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे, त्यांनीही पुढे यावे.
- शशिकांत पवार, सातारा

Web Title: Satara standing humanity wall!