कऱ्हाडचे ‘प्रेरणा’ बनवतेय अंधांना डोळस

हेमंत पवार
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

कऱ्हाड - ज्यांच्या आयुष्यात जन्मत:च अंधार आहे, ज्यांनी जन्मल्यापासून उगवता सूर्यच पाहिला नाही, त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याबरोबर त्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी येथील प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेच्या प्रेरणा दिव्यांग केंद्रातर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्यात कोल्हापूरचे सतीश नवले व हणुमंत जोशी हे दोन अंध तरुण ३० ते ३५ विद्यार्थ्यांना संवेदना, अक्षरओळख, संगणक चालवण्याचे मोफत शिक्षण देत आहेत. 

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या माध्यमातून ‘प्रेरणा’ ही संस्था पुणे येथे कार्यरत आहे. त्या संस्थेतर्फे प्रेरणा दिव्यांग केंद्र या नावाने येथे अंध मुला-मुलींसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याला पालिकेने मोफत जागा दिली आहे. त्यात स्पर्श आणि आवाजाच्या संवेदनेतून अंक, अक्षर ओळख करून देणे, संगणक चालवताना कोणती काळजी घ्यावी, तो कसा हाताळावा,  बोटांव्दारे कीबोर्डची ओळख कशी करून घ्यावी, अंधांसाठी असणारी काठी कशी वापरावी, या ना अशा अनेक बाबींचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. प्रशिक्षणातून ही मुले अंध असूनही संगणकावर स्वतःचे नाव व अन्य माहिती टाईप करू लागले आहेत. याकामी त्यांना सुधीर जाधव, अरुण रोकडे, सुनील शहा, संजय सकुंडे, कुमार पाटील, ॲड. भेदा, सुभाष चरेगावकर हे मदत करत आहेत.  

दानशूरांना साद  
अंध मुले ही शहरासह तालुक्‍यातील आठ ते दहा किलोमीटर परिसरातून येतात. त्यातील बहुतांश मुलांच्या पालकांची परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे त्या मुलांना दररोज कऱ्हाडला घेऊन येणे जमत नाही. काही पालक तर मोलमजुरी करून मुलांना घेऊन येतात, तर काही पालक पैशाअभावी त्या मुलांना घेऊन येण्याचे टाळत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दानशूरांनी अशा अंध मुलांच्या मदतीसाठी पुढे येणे अपेक्षित आहे.

अंध मुले ही सामान्यांप्रमाणे स्वतःच्या पायांवर उभी राहू शकतात. नोकरी करून स्वतःचे घर चालवू शकतात. त्यांच्यात हा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही हे केंद्र चालवत आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-सतीश नवले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satish Navale and Hanumant Joshi special story