चिमुरडी उभारतेय माणुसकीची भिंत

सचिन शिंदे
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

शाळेत जाताना रस्त्यावरील अपंग वृद्ध माणसाला घरातून मी रोज खायला नेते. त्यांना जेवण दिले, की त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच मला उत्साह देऊन जातो. 
श्रुती जगदाळे, विद्यार्थींनी विठामाता विद्यालय , कऱ्हाड.

कऱ्हाड : बस स्थानकावर साठीपार केलेले अपंग थोडेसे वेडसर आजोबा नेहमी बसलेले असतात. ते कोण, कोठून आलेत, हे कोणाला माहीत नाही. तशी कल्पना येथील विठामाता विद्यालयातील इयत्ता आठवीतील चिमुकल्या श्रुती संजय जगदाळे हिला नाही; परंतु त्या भुकेल्या आजोबांसाठी सहा महिन्यांपासून श्रुती रोज सकाळी एकवेळचे जेवण आणून देते. घरची परिस्थिती बेताची असताना जेवणासाठी व्याकूळ आजोबांना दोन घास देण्याचे दातृत्व दाखविणाऱ्या श्रुतीने अनेकांना कृतीतून मापदंड दिला आहे.

हेही वाचा -  तिच्यासाठी त्यांनी जमवले लाखांकडून एक..एक..
 
समाजात सतत वेगवेगळ्या घटना घडतात. काही मनाला स्पर्शून जातात, नव्हे तर मनात घर करून राहतात. तशीच घटना कऱ्हाडच्या बस स्थानकाच्या एका कोपऱ्यात दररोज घडते. मूळची सैदापुरात राहणारी श्रुती जगदाळे आणि तिची बहीण प्रीती या दोघी जुळ्या बहिणी आहेत. त्या विठामाता विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकण्यासाठी येतात. त्यांच्या घरची स्थिती अत्यंत बेताची आहे.

श्रुतीचे वडील सैदापूर ग्रामपंचायतीत घंडागाडीवर चालकपदी नोकरीस आहेत. त्यांना दोन जुळ्या मुलींसह अजून दोन मुली आहेत. सगळ्यात मोठी अंकिता अकरावीला, तर लहान आरती शाळेत जाते. हे कुटुंब खाणावळही चालवते. काही दिवसांपूर्वी या कुटुंबावर संकट ओढावले. श्रुतीच्या आईला एका शस्त्रक्रियेस सामोरे जावे लागले. त्यांचे खुब्याचे व पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी सुमारे दहा लाखांचा खर्च आला. त्यासाठी असलेली काही गुंठ्यांची जमीन त्यांनी गहाण ठेवून तो खर्च पेलेला आहे. घरी खाणावळ व घंटागाडीवरील काम अशी रोजची या कुटुंबाची लढाई सुरू असते. त्याच घरातील श्रुती व प्रीती यांनी अंपग अनोळख्या आजोबांना एकवेळचे जेवण देण्यातून माणुसकीची वीण जोडली आहे.


 
संजय जगदाळे म्हणाले, ""वर्षभरापूर्वी प्रीतीने आम्हाला सांगितले, की एका आजोबांना आम्ही जेवण देणार आहोत. माझी इच्छा आहे. म्हणून द्यायचे आहे. त्यानुसार प्रीती त्या आजोबांना दररोज जेवण घेऊन जाते. मात्र, ते आजोबा कोठे आहेत? ते अपंग आहेत की नाही? याबाबत काहीच कल्पना नाही.''

अवश्य वाचा -  Video : सागवानाच्या झाडातून पाण्याची कारंजी!

त्याबाबत श्रुती अत्यंत साधेपणाने म्हणाली, ""रोज शाळेत जाताना ते आजोबा विजय दिवस चौकाच्या कोपऱ्यात बसलेले दिसायचे. ते नेहमी मदत मागत असतात. त्या वेळी मला वाईट वाटले. ही गोष्ट मी आईला सांगितली. त्यानंतर आजोबांना घरातून रोज खायला नेते. आई व वडिलांनी त्याला विरोध केला नाही. त्यांना जेवण दिले, की त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच मला उत्साह देऊन जातो.'' 

""ते आजोबा कोठून आले, त्यांच्यावर ती वेळ का आली, याची काहीही माहिती नाही. मात्र, त्यांना दररोज जेवण दिले, की बरे वाटते. मनाला आनंद होतो. त्यांना दुसऱ्या पुढे हात पसरावे लागत नाहीत. याचं समाधान वाटते.'' 

श्रुती जगदाळे, कऱ्हाड.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A School Going Student Daily Gives Meal To The Orphan Old Man