चला, बिया संकलन करू या!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

बिया संकलन करताना

  •  बियांचे संकलन करताना त्या ताज्या असाव्यात.
  •  पक्ष्यांच्या विष्ठेतून पडलेल्या, पोपट, माकड यांनी खाल्लेल्या फळांच्या बियांचेही संकलन करावे.
  •  ओल्या स्वरूपात मिळणाऱ्या बिया उन्हात चांगल्या वाळवून घ्याव्यात. 
  •  पर्यटनासाठी गेल्यानंतर तेथील विविध झाडांच्या बियाही संकलित करता येतील. 
  •  ज्या त्या वर्षीच्या बिया चांगल्या रुजतात.

कोल्हापूर - पर्यावरण संवर्धनासाठी येथील निसर्गमित्र संघटनेने नेहमीच सक्रिय पुढाकार घेतला असून, संस्थेच्या बिया संकलन उपक्रमाला आज (ता. २२) पासून प्रारंभ होणार आहे. या उपक्रमात विविध शाळा, महाविद्यालये, संस्थांसह पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. दरम्यान, या उपक्रमाचे यंदा पंधरावे वर्ष आहे. यंदा या उपक्रमातून किमान पाच ते सहा लाखांवर बिया संकलित होतील, अशी अपेक्षा आहे. 

जांभूळ, बेल, शिकेकाई, ऐन, कडुनिंब, किंजळ, शमी, आपटा, बहावा, कांचन, जारूळ, पारिजातक, चिंच, बोर, रिठा, सीताअशोक, सोनचाफा, कडीपत्ता, कडूनिंब, फणस, शेवगा, आवळा, कवठ, धायटी आदी बियांचे संकलन सुरवातीच्या काळात या उपक्रमातून मोठ्या प्रमाणावर झाले. आता वेखंड, गुळवेल, गोकर्ण, अडुळसा, कोहळा, गुंज, कृष्णकमळ, वाघाटी, बाजीराव घेवडा, बदकवेल, घोटवेल, गारंबी, शेंडवेल, रताळी, मायाळू, पॅसनफ्रूट, चिलार, पावटा, रानतूर, चवळी, रानघेवडा, वाल, मूग, राजमा, मटकी, वाटाणा, उडीद, कुळीथ आदी कडधान्यांची वाणंही या उपक्रमातून संकलित केली जाणार आहेत. 

परिक्रमांतर्गत सहभागी झालेल्यांना या बिया कशा रुजवाव्यात, त्यांच्यापासून रोपटी कशी तयार करावीत, याची माहिती दिली जाणार असून, बिया रुजवून त्याची रोपे तयार केली जातात. ती निसर्गप्रेमींना दत्तक दिली जातात. दैनंदिन भ्रमंतीबरोबरच पदभ्रमंती, गड-किल्ले भ्रमंती आणि विविध शिबिरांसाठी बाहेरगावी गेल्यानंतर त्या त्या परिसरातील विविध झाडांच्या बिया संकलित करूनही अशा उपक्रमात सक्रिय सहभागी होता येणार आहे. 

संकलित झालेल्या बिया जमा करण्यासाठीचा पत्ता असा ः दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय, ११४८ साईक्‍स एक्‍स्टेन्शन, टाकाळा रोड आणि अनिल चौगुले, २८२३-४८, बी वॉर्ड, महालक्ष्मीनगर, कोल्हापूर. 

बिया संकलन करताना

  •  बियांचे संकलन करताना त्या ताज्या असाव्यात.
  •  पक्ष्यांच्या विष्ठेतून पडलेल्या, पोपट, माकड यांनी खाल्लेल्या फळांच्या बियांचेही संकलन करावे.
  •  ओल्या स्वरूपात मिळणाऱ्या बिया उन्हात चांगल्या वाळवून घ्याव्यात. 
  •  पर्यटनासाठी गेल्यानंतर तेथील विविध झाडांच्या बियाही संकलित करता येतील. 
  •  ज्या त्या वर्षीच्या बिया चांगल्या रुजतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seed collection by Nisargmitra organisation