धुणीभांडी करणाऱ्या हातात पाटी-पेन्सिल (व्हिडिओ)

पांडुरंग सरोदे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

साक्षरता वर्गाचा महिलांना असा होईल फायदा
* सही करण्यास आल्याने पॅनकार्ड मिळू शकते
* पॅनकार्डमुळे बॅंकांकडून कर्ज उपलब्ध होण्याची शक्‍यता
* महिलांची वेगवेगळ्या पद्धतीची फसवणूक थांबेल
* अडचणीत असल्यास मदतीसाठी विविध पर्याय वापरता येतील
* घरातील व बाहेरच्या त्रासाविरुद्ध आवाज उठविणे शक्‍य

पुणे  - जनता वसाहतीमध्ये राहणाऱ्या ४५ वर्षांच्या विमल मोढवे अनेक वर्षे घरकाम करून उदरनिर्वाह करतात. हे करतानाच त्यांना आपल्यालाही थोडसे लिहिता-वाचता यावे, हिशेब करता यावा, असे वाटू लागले. त्यांच्या मनातील ही सुप्त इच्छा त्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्या ताईला बोलून दाखविली.

विमलताईंसारख्या कष्टाची कामे करणाऱ्या वीसहून अधिक महिलांनीही शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. मग काय, धुणीभांडी करून झिजलेल्या बोटांमधूनच आता पेन्सिलद्वारे ‘श्रीगणेशा’ उमटू लागला आहे!

जनता वसाहत. चार-पाच दशकांपूर्वी गावाकडून पोट भरण्यासाठी आलेल्या कष्टकऱ्यांची वस्ती. अगोदरची पिढी शिक्षणापासून वंचितच राहिली. पुरुषांबरोबरच इथल्या महिलांनीही कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. कोणी चार घरी धुणीभांड्याची 

कामे करून, तर कोणी भाजी, फळे विकून; तर कोणी मजुरी करून, तर कोणी गोळ्या-बिस्किटे विकून उदरनिर्वाह करू लागले. मुले मोठी होऊ लागली, शिक्षण घेऊ लागली. तशी काबाडकष्ट करणाऱ्या महिलांच्याही मनातील शिक्षणाची सुप्त इच्छा जागृत झाली. आपल्याला किमान दोन अक्षरे वाचता यावीत, स्वतःची सही करता यावी, थोडाफार हिशेबही करता यावा, रिक्षाचा नंबर, बसची पाटी वाचायला यायला हवी... अशा वेगवेगळ्या कारणांमुळे कष्टकरी महिलांना शिक्षण घ्यावेसे वाटले. म्हणून, त्यांनी वस्तीमध्येच राहणाऱ्या संध्या बोम्मन्ना यांच्याकडे तशी इच्छा व्यक्त केली. बोम्मन्ना यांनाही ते पटले. त्यांनी आपल्या नवरत्न बचत गटाच्या माध्यमातून अशा महिलांना एकत्रित आणून शिक्षण देण्याचे ठरविले. त्यासाठी स्वखर्चाने पाटी, पेन्सिल, फळा, खडू आणि पुस्तके आणली.

वस्तीमधीलच जरा चांगल्या शिक्षण घेतलेल्या महिला शिकविण्यासाठी पुढे आल्या आणि गुढीपाडव्याच्या दिवशीच त्यांनी शिक्षणाचा श्रीगणेशा केला. विमल मोढवे, रुक्‍मिणी माने, उल्फत शेख, नसीम तांबोळे अशा वीसहून अधिक महिला आपली दैनंदिन कामे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून दररोज संध्याकाळी एक तास वस्तीमधील साक्षरता वर्गामध्ये शिक्षण घेण्यासाठी एकत्र येत आहेत. जनता वसाहतीमधील गल्ली क्रमांक ७१, ९२ व ९३ मध्ये तीन ठिकाणी साक्षरता वर्ग घेतले जात आहेत.

घरकामासह वेगवेगळी कामे करणाऱ्या महिलांनी स्वतःच त्यांना शिकायचे असल्याचे सांगितले होते. त्यांना शिक्षण नेमके कशासाठी घ्यायचे आहे, हे जाणून घेतल्यानंतर आम्ही हा साक्षरता वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या तीन वर्गांमध्ये २० महिला शिक्षण घेत आहेत. भविष्यात ही संख्या वाढेल.
- संध्या बोम्मन्ना, सामाजिक कार्यकर्त्या.

 परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही. लिहिता-वाचता आल्यास शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होईल. साक्षरता वर्गात एक तास घालविल्यास आयुष्य बदलेल, असं वाटतंय.
- नसीम तांबोळी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Servant Education Learn Vimal Modhave Motivation