बहिणीच्या यकृताने भावाला जीवनदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नागपूर - यकृत निकामी होऊन मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या भावाला यकृताचा काही भाग दान करीत बहिणीने जीवनदान दिले. नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच लाइव्ह  लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी झाले आहे. 

नागपूर - यकृत निकामी होऊन मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या भावाला यकृताचा काही भाग दान करीत बहिणीने जीवनदान दिले. नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच लाइव्ह  लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी झाले आहे. 

ऐन रक्षाबंधनाच्या पर्वावर भावाला मृत्यूच्या दारातून परत आणण्याचे अनमोल सत्कर्म बहिणीने यकृत दानातून केले आहे. विशेष असे की, रविवारी बहिणीकडून भावाला यकृत दान करण्यात  येत असल्याने समितीची परवानगी आवश्‍यक आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पुढाकार घेत रविवारी सुटी असतानाही अवयव प्रत्यारोपणासाठी परवानगी दिली. न्यू इरा हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. 

गोळीबार चौकातील प्रणय कुऱ्हाडकर (वय २४) असे भावाचे नाव आहे. विशेष असे की, प्रणय हा अत्यंत गरीब असून मुंजे चौकातील कापडाच्या शिवम या शोरूममध्ये काम करतो. गेल्या महिन्यात त्याची प्रकृती खालवली होती. उपचार सुरू होते. परंतु, आजार वाढत गेला. अखेर त्याला श्रीकृष्ण हृदयालयात दाखल केले. विविध तपासण्यानंतर यकृत निकामी झाल्याचे निदान झाले. डॉक्‍टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. दरम्यान, लकगडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. 

न्यू इराची सामाजिक बांधीलकी
न्यू इरातील डॉक्‍टरांकडे निधी जमा करण्यात आला. शस्त्रक्रियेपूर्वी पूर्ण खर्च जमा करणे  आवश्‍यक आहे. परंतु, या गरीब प्रणयवर शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यात येत असल्याने पैशाची पर्वा न करता प्रत्यारोपणाची तयारी सुरू केली. २१ वर्षीय बहिणीच्या या भावाला वाचवण्याचे  मोठे आव्हान डॉ. राहुल सक्‍सेना, डॉ. सोमनाथ चटोपाध्याय यांनी पेलवले. डॉ. आनंद संचेती यांच्या नियोजनात प्रत्यारोपण झाले. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी तातडीने प्रत्यारोपणासाठी मंजुरी दिली याबद्दल डॉ. संचेती यांनी आभार मानले. यामुळेच न्यू इरा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच लाइव्ह ट्रान्सप्लांट होऊ शकले. यापूर्वी सात प्रत्यारोपण मेंदूमृत व्यक्तीकडून मिळालेल्या यकृताचे होते.

दहा लाखांचा  निधी गोळा 
बहिणीने यकृत दानाची तयारी दर्शविली, परंतु यकृत प्रत्यारोपणासाठी लाखोंचा निधी आवश्‍यक आहे. निधी कसा उभा करायचा हा प्रश्‍न होता. शोरूममधील प्रणयच्या मित्रांना ही बातमी कळताच मित्रांनी प्रणयवर होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. कापडाच्या शोरूममधील मित्रांकडून एकाच दिवसात दोन लाखांचा निधी गोळा झाला. एका मित्राने फेसबुकवर ही माहिती दिली. अशाप्रकारे एकूण दहा लाखांचा निधी गोळा झाला.

Web Title: The sister liver should give life to the brother