#WednesdayMotivation : निवासी शाळेतील लेकरांना लाभली ‘स्नेह’ अन्‌ छाया

आशा साळवी
Wednesday, 11 March 2020

अर्धांगिनी बनली पूर्ण वेळ सहकारी
सुरवातीला पत्नी सारिकामाईंनी उदरनिर्वाहाचे कसे होईल? या भीतीपोटी पतीला विरोध केला. पण पतीची मुलांप्रती ओढ आणि तळमळ पाहून विरोध करण्याऐवजी त्या त्यांच्या उपक्रमात अगदी सक्रियपणे सहभागी झाल्या.

दिघीतील सारिका यांची ‘प्राध्यापक पती परमेश्‍वर’ला सक्रिय साथ
पिंपरी - स्वतःचे स्वप्न, आवडी-निवडी, इतकेच नव्हे तर क्षणभर आराम अशा साऱ्या गोष्टी बाजूला ठेवत कला शाखेच्या पदवीधर दिघीतील सारिका इंगळे यांनी वेगळी वाट धरलेल्या पतीला सक्रिय साथ देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी फासेपारधी, भिल्ल, ऊसतोडणी कामगार, नंदीवाले, आत्महत्याग्रस्त शेतकरी अशा कुटुंबांतील मुलांसाठी निवासी शाळेत स्वत:ला झोकून दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्या स्नेहछाया परिवारातील १५ मुलांची पोटच्या लेकरांपेक्षा अधिक काळजी घेणारी आणि मायेची ऊब देणारी ‘माई’ बनल्या आहेत. सारिकामाईंची जन्मभूमी बीड जिल्हा, मात्र कर्मभूमी पिंपरी चिंचवड शहर ठरली. पती प्रा. दत्तात्रेय इंगळे यांनी सामाजिक कार्याच्या ध्यासापोटी चांगल्या पगाराची शिक्षकाची नोकरी सोडली आणि आठ वर्षापूर्वी स्थलांतरित व वंचितांची लेकरं शिकावीत यासाठी पालावरची अक्षरशाळा सुरू केली.
सध्या पालावरच्या शाळेत १२७ मुले शिकत आहेत. या दांपत्याने मराठवाडा, विदर्भ, रायगड येथे सर्वेक्षण केला. त्यात अतिवंचित असलेली व ज्यांनी शिक्षणाचा श्रीगणेशादेखील केला नाही अशा ऊसतोडणी कामगार, नंदीवाले, फासेपारधी, भिल्ल यांच्या मुलांसाठी एका मित्राच्या मोकळ्या जागेत पत्राच्या शेडमध्ये ‘स्नेहछाया परिवार’ नावाने निवासी शाळा सुरू केली. सध्या लोकसहभागातून हे कार्य सुरू आहे. या १५ लेकरांच्या परिवाराची जबाबदारी माईंनी स्वीकारली आहे.

आयटीयन्ससाठी आता ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा

माई २४ तास व्यस्त असतात. इथे त्यांना ना मैत्रिणींचा मेळा न तासन्‌तास गप्पा, ना ‘इडियट बॉक्‍स’ व मनोरंजन, ना शेजारीण, ना सहकर्मचारी महिला...तर इथे आहेत फक्त १५ लेकरं, त्या अन्‌ पती असा १७ जणांचा परिवार आहे. सकाळी पाचपासून रात्री झोपेपर्यंत फक्त कामच करतात. सकाळी सर्वांना गरमागरम नास्ता, दोन वेळच्या जेवणाची तयारी, भांडी, भाजीपाला खरेदी, आलेल्या पाहुण्यांना स्वागत, जेवण, प्रकल्प संबंधित माहिती, लेकरांना शाळेत सोडायला व घ्यायला जाणे, आजारी पडल्यावर दवापाणी देणे, अभ्यासात मदत अशी कामे त्या करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: snehchaya family poor child education motivation Humanity