"बहुरूपी'च्या मुलाला केले डॉक्‍टर

"बहुरूपी'च्या मुलाला केले डॉक्‍टर

सोलापूर - ""पोटासाठी विविध भूमिका आणि गमतीजमती करत गावोगावी फिरणाऱ्या बहुरूपी समाजातील काही व्यक्ती मला भेटल्या. त्यातले किसन शेगार आणि त्यांचे बंधू माझ्याकडे येत. त्यांना मी म्हणालो, किती दिवस वणवण फिरायचं. मुलाचं शिक्षण चांगलं व्हायला पाहिजे. शेगार म्हणाले, मुलाला डॉक्‍टर करायचंय. तेव्हापासून आम्ही चंग बांधला. मोहननेही उत्तम अभ्यास करून जिद्दीने एमबीबीएस पूर्ण केले.'' सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता राजेश जगताप आठवणींना उजाळा देत होते... 

मोहनने अत्यंत मेहनत घेऊन अभ्यास केला. त्याला सर्व प्रकारची मदत जगताप यांनी केली. केवळ मोहनच नव्हे; तर बहुरूपी समाजातील रमेश आणि विकास शिंदे यांच्या मुलांनीही "एमपीएससी'चा अभ्यास सुरू केला. त्यांनाही जगताप आर्थिक मदतीसह सर्व सहकार्य देतात. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर मोहनला अक्कलकोट तालुक्‍यातील करजगी प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी मिळाली. अक्कलकोट तालुक्‍यातच जगताप 21 वर्षांपासून सेवारत आहेत. 

राजेश जगताप, माणुसकीला जागणारे व्यक्तिमत्त्व. सरकारी नोकरीत असूनही संवेदनशील. त्यांनी कार्यालयातील कक्षात फलक लावलाय, ""पगारात भागवा अभियान.'' "माझे पद आणि माझ्या पगारावर मी समाधानी आहे. तुम्ही माझ्या कामावर समाधानी आहात का?' असं त्यांनी त्यावर लिहिलंय. भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी आणि झिरो पेंडन्सी असा त्यांचा कारभार असतो. राजेश यांचे वडील दादासाहेब जगताप हे प्रशासकीय सेवेत होते. त्यांच्या बदल्या ज्या गावांत होत, तिथं राजेश यांचं शिक्षण व्हायचे. अक्कलकोट तालुक्‍यात ते अधिक काळ होते. अभियंता झाल्यावर राजेश यांना तालुक्‍यातच नेमणूक मिळाली. अंगणवाडीसाठी इमारती, रस्ते, दारिद्रयरेषेखालील जनतेसाठीची घरे बांधण्याचे काम त्यांनी केले. प्रसंगी स्वतः रोडरोलर चालवला. स्वतःचा वाढदिवस ते वृक्षारोपणाने साजरा करतात. त्यांनी आजवर तेवीसशे झाडे लावून जगवलीत. लोकसंग्रह मोठा असल्याने त्यांनी मित्रांना शेकडो झाडे लावायला प्रवृत्त केले. सोलापूरचा पहिला एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, औरंगाबादचे रफिक शेख, मनीषा वाघमारे यांनाही जगताप यांनी मोठी मदत केली. 

जुन्या, उत्तम बॅगांचे वाटप 
अनेक जण थोड्याशा फाटलेल्या किंवा उसवलेल्या बॅगा फेकून देत असल्याचे राजेश यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या जमविल्या. त्या दुरुस्त करून गरीब मुलांना वाटल्या. सहा वर्षांपासून त्यांनी सुमारे एक हजार बॅगा गरजू मुलांना वाटल्यात. 

वैद्यकीय शिक्षणासाठी मला राजेश जगताप यांचे मोलाचे सहकार्य झाले. त्यांच्यामुळे मी नेटाने अभ्यास केला आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो. 
- डॉ. मोहन शेगार, जिल्हा क्षयरोग अधिकारी, सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com