विळ्याची जागा जेव्हा कुंचला घेतो...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

पुणे - जी पावले कॅनव्हासच्या दिशेने पडायला हवी, ती उसाच्या फडात पडली. ज्या हातात रंगांचा कुंचला हवा, त्या हातात ऊस तोडण्याचा विळा... तरीही याच हातातून अनेक कलाकृतींनी जन्म घेतला. त्यातूनच साकारली गेली असामान्य चित्रे. जगण्यासाठी आयुष्यभर मिळेल ती मजुरी केली. परंतु, आयुष्याचा खरा अर्थ शोधण्यासाठी त्याने हातातील कुंचला कधीच खाली ठेवला नाही.

पुणे - जी पावले कॅनव्हासच्या दिशेने पडायला हवी, ती उसाच्या फडात पडली. ज्या हातात रंगांचा कुंचला हवा, त्या हातात ऊस तोडण्याचा विळा... तरीही याच हातातून अनेक कलाकृतींनी जन्म घेतला. त्यातूनच साकारली गेली असामान्य चित्रे. जगण्यासाठी आयुष्यभर मिळेल ती मजुरी केली. परंतु, आयुष्याचा खरा अर्थ शोधण्यासाठी त्याने हातातील कुंचला कधीच खाली ठेवला नाही.

ही गोष्ट आहे एका ऊसतोड मजुराच्या मुलाची. मोतिलाल राठोड या सोलापूरमधील तरुणाने चित्रकलेचे कोणतेही शिक्षण घेतले नाही; किंबहुना परिस्थितीमुळे त्याला शिक्षण घेणेही परवडणारे नव्हते. आई-वडिलांना, आजूबाजूच्या लोकांना तो काय करीत आहे, याची जाण असणे दुरापास्तच होते. तरीही, एक दिवस जेमतेम गाडी खर्चाचे पैसे जमा करून त्याने पुण्यात त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरविले. तेव्हा लोकांचा प्रतिसाद बघून ‘पोराच्या मेहनतीत राम आहे’ हा विश्वास आई-वडिलांना आला. परंतु, जेव्हा शाळेत जाऊन अभ्यास करून मोठे होण्याचे स्वप्न बघायचे दिवस होते, तेव्हा शेतात मजुरी करणे त्याला भाग होते. त्याने बारावीपर्यंत कसेबसे शिक्षण घेतले. मात्र, त्याच्या डोक्‍यात फक्त रंग आणि कॅनव्हासचा विचार होता. खिशाला परवडेल तसे कागद गोळा करायचे, रंग जमवायचे आणि चित्रे काढायची. सरावाचे सातत्य, निरीक्षण व आवड, या जोरावर तो कलाकृती रेखाटत होता. 

एकीकडे आई-वडील मजूर, बहिणीचे आजारपण, यामुळे त्यालाही रोजची चूल पेटविण्यासाठी काम करावे लागत होते. शेतात काम करून सुरकुतलेल्या हातांनी जेव्हा कुंचला हातात घेतला, तेव्हा याच हातातून सृजनाचा आविष्कार सत्यात उतरत होता. व्यक्तिचित्र, मॉडर्न आर्ट, वॉटर कलर पेंटिंग अशी विविध चित्रे तो फक्त सरावाने शिकला. एखाद्या प्रशिक्षित चित्रकाराला लाजवेल अशी चित्रे त्याने कोणतेही प्रशिक्षण न घेता काढली आहेत.

माझ्या हातात जेव्हा ऊस तोडण्यासाठी विळा आणि कोयता यायचा, तेव्हा आपल्या हातात कॅनव्हासवरील ब्रश हवा, असा विचार सतत यायचा. परिस्थितीमुळे कायम मजुरी केली. पण, कलेचा वसा मात्र कायम ठेवला. अजूनही त्यासाठीच धडपड चालू आहे. 
- मोतिलाल राठोड, चित्रकार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: story of a sugarcane laborer boy