रसवंतीगृह बनले वाशीतील आंधळे कुटुंबाचा आधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

गरम हवा आणि कडक उन्हाने हैराण झालेले नागरिक घशाला कोरड पडत असल्याने रसवंतीगृहाकडे वळतात. वाशीतील अशाच नागरिकांची तहान भागवण्याचे काम आंधळे कुटुंबीय करत आहे.

तुर्भे - उन्हामुळे अंगाची काहिली होत आहे. त्यामुळे नागरिकांची पावले आपसूकच थंडगार उसाचा रस पिण्यासाठी रसवंतीगृहाकडे वळत आहेत. तसा खिशाला परवडणारा आणि आरोग्यवर्धक असाच उसाचा रस आहे. १५ रुपयांना एक ग्लास घेतल्यानंतर कडक उन्हाने घामाघूम झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान तरळते; तर उसातून रस गाळण्यासाठी अंगातून घाम गाळणाऱ्या रसवंतीगृह चालकाच्या हातात चार पैसे पडल्यानंतर सायंकाळी पोटाला चार घास मिळतील, या आशेने तो सुखावतो. काहीशी अशीच परिस्थिती वाशीतील आंधळे कुटुंबाची आहे.

गरम हवा आणि कडक उन्हाने हैराण झालेले नागरिक घशाला कोरड पडत असल्याने रसवंतीगृहाकडे वळतात. वाशीतील अशाच नागरिकांची तहान भागवण्याचे काम आंधळे कुटुंबीय करत आहे. उष्म्यामुळे उसाच्या रसाला जास्त मागणी आहे. व्यापाऱ्यांकडून ७०० रुपये क्विंटल दराने ऊस खरेदी करून ते १५ रुपयांना एक ग्लास उसाचा रस विकतात. त्यासाठी अख्खे कुटुंब राबते. सकाळी १० पासून सायंकाळी ७ पर्यंत काम केल्यावर त्यांना कुठे पोटापुरते पैसे मिळतात. 

दुष्काळाने होरपळलेल्या नगरमधील पाथर्डी तालुक्‍यातील रांजणीचे आंधळे कुटुंबीय पोटाची खळगी भरण्यासाठी नवी मुंबईतील वाशीत आले. ते जुहूगावात भाड्याच्या घरात राहतात. निरक्षर असल्यामुळे मिळेल तिकडे मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. एक-दोन वर्षांपासून लाकडी गाडीवर रसवंतीगृह सुरू करून संसाराचा गाडा हाकण्याचे काम अशोक आंधळे करत आहेत. गावाकडे वडील व तीन भाऊ आहेत. येथे ते पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलासह राहतात. वडील आजारी असल्याने घरीच असतात. पत्नी घरातील कामे करून त्यांना कामात हातभार लावते. उसाच्या रसातून मिळालेल्या पैशातील काही पैसे गावाकडे वडिलांना पाठवल्यानंतर उरलेल्या पैशात घर आणि रसवंतीगृह चालवण्याची ते कसरत करतात. दुष्काळी भागात अनेक शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत. मात्र आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देत अशोक आंधळे घाम गाळून संसाराचा गाडा हाकत आहेत, हे कौतुकास्पद म्हणावे लागेल.

Web Title: sugarcane juice center support andhale family