मास्तरकीला झालर सामाजिक दातृत्वाची

दिलीप वैद्य
मंगळवार, 31 जानेवारी 2017

शिक्षकाचा विवाहाचा एक लाख खर्च शाळा, शेतकरी मुलींच्या नावे 

शिक्षकाचा विवाहाचा एक लाख खर्च शाळा, शेतकरी मुलींच्या नावे 
रावेर :  शिक्षकी पेशा म्हणजे विद्यादान अन्‌ संस्कारातून पुढच्या पिढीचे भविष्य घडविणारा घटक. विद्यादानाबरोबरच शिक्षकाला सामाजिक भान असले, तर तो संपूर्ण समाजात वेगळा आदर्श निर्माण करू शकतो याचा प्रत्यय मुक्ताईनगर तालुक्‍यात आला. तेथील पारंबी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने आपल्या लग्नाच्या खर्चाला फाटा देत सुमारे एक लाख रुपयांची रक्कम काही शाळा आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींच्या नावे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मास्तरकीला सामाजिक दातृत्वाला झालर चढविणाऱ्या या शिक्षकाचे नावे आहे भगवान पांडे..! 

आपल्या विवाहातील बॅंड (वाजंत्री), मोठी जेवणावळ या अवास्तव बाबींना फाटा देत श्री. पांडे यांनी तीन प्राथमिक शाळांच्या विकासासाठी प्रत्येकी 10 हजार व पाच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 7 मुलींच्या नावे प्रत्येकी 10 हजार असा खर्च करीत समाजासमोर वेगळा आदर्श घालून दिला. यापूर्वी श्री. पांडे गुरुजींनी नाना पाटेकर यांच्या नाम या संस्थेला देखील 10 हजार रुपयांची देणगी दिल्याची माहिती त्यांचे पाडला शाळेतील सहकारी शिक्षक अनिल महाजन यांनी "सकाळ'ला दिली. 

अलीकडे विवाहात मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करण्याची व आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याची स्पर्धा लागलेली दिसते. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्‍यातील झाडेगाव येथील रहिवासी भगवान हरिभाऊ पांडे या 27 वर्षीय प्राथमिक शिक्षकाने या बाबींना फाटा दिला आहे. त्यांचा विवाह 3 फेब्रुवारीला बेलखेड (ता. तेल्हारा, जि. अकोला) येथे साध्या पद्धतीने होत आहे. त्यांनी आपल्या पारंबीच्या प्राथमिक शाळेला तर देणगी दिलीच, पण त्यांची शिक्षक म्हणून प्रथम नियुक्ती झालेल्या रावेर तालुक्‍यातील पाडळे येथील आणि प्राथमिक शिक्षण घेतलेल्या झाडेगाव येथील शाळेलाही विसरले नाहीत. पाडळे आणि पारंबी येथील शाळेला त्यांनी यापूर्वीच 10 हजार रुपयांचा धनादेश दिला आहे; तर हळदीच्या दिवशी (ता. 2) झाडेगाव शाळेला धनादेश दिला जाणार आहे. 
 

या शेतकरी कन्यांना मदत 
पांडे यांनी आपल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्‍यातील पाच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील 7 मुलींच्या नावे प्रत्येकी 10 हजार रुपयांचे धनादेश तयार ठेवले आहेत. ते देखील हळदीच्या दिवशी देण्यात येणार आहेत. रामदास जाधव, रामधन हेलोडे, अरुण वझे आणि अनिल भोळे या शेतकऱ्यांच्या प्रत्येकी एका मुलींच्या नावे आणि विलास काळपांडे या शेतकऱ्यांच्या 3 मुलींच्या नावे प्रत्येकी 10 हजार रुपये ठेवण्यात येणार आहेत. या सर्व मुली सध्या अल्पवयीन असून 10 वर्षांनी त्या विवाहयोग्य होतील, तेव्हा व्याजासकट त्यांना ही रक्कम मिळणार आहे. 
 

Web Title: teacher give social aware