शिक्षिकेच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थिनीला जीवनदान 

संदीप घिसे - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पिंपरी - पाचवीतील विद्यार्थिनीच्या हृदयाला होल असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शस्त्रक्रिया करणे शक्‍य नव्हते. याकामी वर्गशिक्षिकेने पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून दिला. गेल्याच आठवड्यात त्या विद्यार्थिनीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. 

पिंपरी - पाचवीतील विद्यार्थिनीच्या हृदयाला होल असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शस्त्रक्रिया करणे शक्‍य नव्हते. याकामी वर्गशिक्षिकेने पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून दिला. गेल्याच आठवड्यात त्या विद्यार्थिनीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. 

वैष्णवी लक्ष्मण धोत्रे असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती चिंचवड स्टेशन येथील महापालिकेच्या कन्या शाळेत पाचवीत शिकत आहे. शालेय तपासणीत तीन वर्षांपूर्वी तिच्या हृदयाला होल असल्याचे दिसून आले. त्या वेळी वैष्णवीच्या पालकांनाही कळविण्यात आले. वैष्णवीची आई निर्मला या पतीपासून विभक्‍त राहत असून, इंदिरानगर झोपडपट्टीत वडील व दोन मुलांसह भाड्याने राहतात. चार घरची धुणीभांडी करून घराची उपजीविका चालवितात. यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे आणायचे कोठून असा प्रश्‍न त्यांना पडला. 

वैष्णवी सध्या पाचवीत असून, तिच्या वर्गशिक्षिका सविता गावडे यांनाही ऑगस्ट महिन्यात झालेल्या तपासणीत तिच्या हृदयाला होल असल्याचे समजले व तिच्यावर शस्त्रक्रिया करणे किती गरजेचे आहे हेही तिच्या पालकांना समजावून सांगितले. त्यानंतर ऑपरेशनसाठी निधी उभारण्याची तयारी करण्यात आली. त्या भाड्याने राहत असल्याने त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. यामुळे प्रथम शिधापत्रक काढण्यात आले. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी प्रशासनाला समजून प्रसंगी भांडून त्याचे महत्त्व सांगावे लागले. शिधापत्रक दारिद्यरेषेखालील नसल्याने मोफत उपचार करता येत नव्हते. 

अखेर कागदपत्रांची जुळवणी केल्यावर विविध संस्थांकडे मदतीसाठी अर्ज केले. त्यांच्या या प्रयत्नांना मुख्याध्यापिका नंदा शितोळे, सहकारी शिक्षण तानाजी कुकनर, मनोज मराठे व विजया सोनटक्‍के यांचीही साथ लाभली. पंतप्रधान निधीतून 50 हजार, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट (मुंबई) यांच्याकडून 25 हजार, साई संस्थान (शिर्डी) यांच्याकडूनही मदत प्राप्त झाली. महापौर निधी व एलआयसी चाकण यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत मिळाली. गरज भासल्यास उर्वरित पैसे आपण उभे करून असे शिक्षकांचे ठरले. नुकतेच 17 डिसेंबर रोजी वैष्णवीवर खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर तिला घरी आणल्यावर शाळेतील शिक्षण तिला भेटण्यासाठी घरी गेले. त्या वेळी ती घरीच एकटीच बसली होती. तिची काळजी घेण्यासाठीही कोणी नसल्याने शिक्षकांचे डोळे भरून आले. तिची प्रकृती लवकर ठीक व्हावी, यासाठी तिला ड्रायफूट देण्यात आले. वर्गशिक्षिका सविता गावडे यांनी पुढाकार घेऊन केलेल्या प्रयत्नांमुळे त्या विद्यार्थिनीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने शिक्षण मंडळाच्या वतीने रविवारी (ता.25) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार केला. 

ससून रुग्णालयात उपचारास पालकांचा विरोध 
महापालिकेकडून तिच्यावर मोफत उपचार होणे आवश्‍यक होते. मात्र, महापालिका रुग्णालयात अशी कोणतीही व्यवस्था नाही. रुबी एल्केअर रुग्णालयात भरण्यासाठी तिच्या पालकांकडे पैसे नव्हते. ससून रुग्णालयात उपचारासाठी तिच्या पालकांनी विरोध केला. अखेर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया केली आहे. 

Web Title: Teacher student life efforts