मंदिरातील नैवेद्याचा अनाथाश्रमात गोडवा

राजेंद्रकृष्ण कापसे
शनिवार, 27 जुलै 2019

आषाढ महिन्यात देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. प्रत्येक घरातून आलेल्या नैवेद्याने मंदिरात त्याचा ढीग साठतो. एवढं सगळं अन्न वाया जात असतं. मात्र, खडकवासला येथील महिलांनी हे अन्न अनाथाश्रमातील महिलांना देऊन एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

खडकवासला - आषाढ महिन्यात देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. प्रत्येक घरातून आलेल्या नैवेद्याने मंदिरात त्याचा ढीग साठतो. एवढं सगळं अन्न वाया जात असतं. मात्र, खडकवासला येथील महिलांनी हे अन्न अनाथाश्रमातील महिलांना देऊन एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

खडकवासलाचे माजी ग्रामपंचायत सदस्य आशा ऊर्फ लक्ष्मी मते यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला. आखाड म्हटले, की मांसाहार जेवणाच्या पंगतीच असतात. पण, आखाडातील मंगळवारी मात्र शुद्ध शाकाहारी बेत असतो. पुरणपोळ्या करून त्याचा नैवेद्य गावातील ग्रामदैवतेला दाखविला जातो. 

मंदिरात या सगळ्या नैवेद्याचा ढीग लागलेला असतो अन्‌ शेवटी तो उचलून निर्माल्य म्हणून सोडला जातो.पण, हा नैवेद्य जमा करून वृद्ध किंवा अनाथाश्रमात दिला तर, अशी कल्पना लक्ष्मी मते यांना सुचली. त्यांनी ही कल्पना सुरेखा संजय मते, सुरेखा प्रकाश मते, छाया मते, मेघा मते, विद्या मते या महिलांना सांगितली. त्यांनाही कल्पना आवडली. 

हा उपक्रम गावातील प्रत्येक महिलेपर्यंत गेला पाहिजे, म्हणून त्यांनी याचा एक संदेश तयार केला. नैवेद्य कसा आणायचा, याबाबतचा संदेश त्यांनी सोशल मीडियावरून गावातील सर्व महिलांना पाठविला. नातेगोते, बचत गटांमुळे गावातील प्रत्येक घरी तो संदेश पोचविला. 

गावातील भैरवनाथ मंदिरात मंगळवारी प्रत्येक महिलेने जेवणाचे ताट तयार करून आणले होते. आशा मते यांनी मात्र पोळ्यांसाठी मोठे घमेले, आमटी, गुळवणी-दूध आणि भात यासाठी स्वतंत्र डबे ठेवले होते. मंदिरात आणलेला नैवेद्य त्यांनी त्या भांड्यांमध्ये जमा करून घेतला. हे जमलेले पुरणपोळ्यांचे जेवण थेट आंबी फाट्यावरील निराधार, वृद्ध आश्रमात आणून दिले. घरी केलेले अन्न मिळाल्याने तेथील निराधार, वृद्धांनी आनंदाने सेवन केले. या उपक्रमाबद्दल सर्व जणींचे कौतुक होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temple Women Navaidya Orphanage