टाकाऊपासून टिकाऊ कुंड्यात फुलवली टेेरेस बाग

नंदिनी नरेवाडी
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

कोल्हापूर - घराच्या टेरेसवर किंवा बाल्कनीतच वृक्षारोपणाची हौस अनेकजण भागवतात. मातीच्या तसेच प्लास्टिक किंवा सिमेंटच्या कुंड्यांतही रोपे लावतात. अशा हौसेला सौंदर्याबरोबर टिकाऊपणा व वृक्षवाढीला बळ देणारे ‘झाडाचे घरटे’ पर्यावरणप्रेमींना खुणावत आहे. वरून कापडी दिसत असल्या तरी वास्तवात मात्र टाकाऊपासून टिकाऊ अशा कुंड्या सासने कॉलनीतील सागर व अमृता वासुदेवन यांनी तयार केल्या आहेत. 

कोल्हापूर - घराच्या टेरेसवर किंवा बाल्कनीतच वृक्षारोपणाची हौस अनेकजण भागवतात. मातीच्या तसेच प्लास्टिक किंवा सिमेंटच्या कुंड्यांतही रोपे लावतात. अशा हौसेला सौंदर्याबरोबर टिकाऊपणा व वृक्षवाढीला बळ देणारे ‘झाडाचे घरटे’ पर्यावरणप्रेमींना खुणावत आहे. वरून कापडी दिसत असल्या तरी वास्तवात मात्र टाकाऊपासून टिकाऊ अशा कुंड्या सासने कॉलनीतील सागर व अमृता वासुदेवन यांनी तयार केल्या आहेत. 

‘पेट बॉटल रिसायकल जिओ मटेरियल’पासून बनवलेल्या या कुंड्या आहेत. या कुंड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या रोपाला पोषक असे वातावरण तयार करतात. शिवाय स्वयंपाकघरातील कचरा, पालापाचोळा व थोडीशी माती घातली, तरी रोपटे फुलून येते. सर्व प्रकारची झाडे या कुंडीत लावू शकतो; तसेच बाल्कनी, टेरेसवर झाडे लावण्यासाठी विविध आकारांतील या कुंड्या उपयुक्त ठरत आहेत. 

‘पेट बॉटल रिसायकल जिओ मटेरियल’ ची कुंडी

टाकावूपासून टिकाऊ अशी ही कुंडी आहे. पाण्याच्या प्लास्टिक बाॅटल तसेच अन्य प्लास्टिक मटेरिअल हा कचरा कसा नष्ट करायचा हा मोठा प्रश्न सध्या भेडसावत आहे. अशाच प्लास्टिकपासून ही कुंडी तयार केली जाते. 

फुलझांडापासून ते मोठमोठ्या फळझाडांपर्यंतची झाडे त्यांनी आपल्या टेरेस व बाल्कनी गार्डनमध्ये या कुंड्यांमध्ये लावली आहेत. शेवगा, लिंबू, चिकू ही फळझाडे; तर चाफा, गुलाब अशी फुलझाडेही त्यांनी या कुंड्यांत लावली आहेत.

प्लास्टिक व सिमेंटच्या कुंडीत झाडांना हवा आणि पाणी योग्य प्रमाणात मिळत नसल्याने झाडांची योग्य वाढ होऊ शकत नाही. साचून राहिलेल्या पाण्यामुळे झाडांची मुळे कुजतात; पण या कुंडीत झाडांना पोषक वातावरण निर्मिती केली जाते. पाण्याचा व्यवस्थित निचरा होतो. त्यामुळे झाडांची व्यवस्थित वाढ होते. 
- अमृता वासुदेवन

फळभाज्यांचीही लागवड
फळझाडे व फुलझांडासोबत वासुदेवन यांच्या टेरेस गार्डनमध्ये या प्रकारच्या कुंड्यांत फळभाज्यांचीही लागवड केली आहे. यात त्यांनी एकाच वेळी प्लास्टिक व या कुंडीत वांग्याचे बी घातले होते. प्लास्टिकच्या कुंडीतल्या झाडाला अजून फुलेही आलेली नाहीत. त्याच वेळी कुंडीतल्या झाडाला वांगी लागली असल्याचे सागर वासुदेवन यांनी सांगितले.

या प्रकारांत आहेत कुंड्या 
हॅंगिंग कुंड्या, तुळशीचा कट्टा, गोल, षट्‌कोनी, चौकोनी, डी आणि डबल डी आकारातील, कोन, पोल, व्हर्टिकल पॉकेट गार्डन, वाफ्याच्या आकारातील कुंड्या. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terrace garden Durable Pot preparation from waste