दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला ठाणे पोलिस

Sayaji Shinde
Sayaji Shinde

ठाणे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सगळेच राजकीय पक्ष सरसावत होते; मात्र पहिलांदाच पोलिसदादा दुष्काळग्रस्तांसाठी धावून आले आहेत. अभिनेता सयाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात राबवलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला अनुसरून ठाणे पोलिस दलाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे ठरवले आहे. येथील शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल कोणत्याही दलाल, अडत्या वा मध्यस्थाशिवाय थेट ठाण्यात विक्रीसाठी उपलब्ध करण्याचे ठरवले आहे. पोलिस आयुक्त परमबीर सिंग, सहआयुक्त आशुतोष डुंबरे आणि उपायुक्त रश्‍मी करंदीकर आदींच्या पुढाकाराने सुरू होणाऱ्या या उपक्रमाला 9 डिसेंबरला ठाणे पोलिसांच्या सिद्धी हॉलमध्ये सुरुवात होत आहे.


दुष्काळग्रस्तांना राजकीय पक्षांकडून आर्थिक मदत देण्याचे सोपस्कार पार पाडण्याबरोबरच संसारोपयोगी साहित्याचे वाटप, सामूहिक विवाह सोहळे होतात; मात्र दुष्काळाच्या मुळाशी जाऊन थेट जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जागोजागी पाणी साचवून-अडवून जलक्रांती घडवत अभिनेता सयाजी शिंदे यांनी राबवलेल्या चळवळीमुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवले. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यातील पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी, दिवडी आदींसह नजीकच्या गावात कुठलाही औद्योगिक प्रकल्प अथवा कंपन्या न आणता लोकसहभागातून जलसंधारण कामे करून मुबलक शेती पिकवली. हा शेतीमाल स्वच्छ नैसर्गिक पाण्यावर पिकवल्याने सकस आणि पौष्टिक आहे. भाजीपाला, धान्य, कडधान्य आदी या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सयाजी शिंदे यांच्या मदतीला ठाणे पोलिस धावले आहेत. पोलिसांच्या वसाहतीमध्ये थेट विक्री करण्याचा उपक्रमाची सुरुवात 9 डिसेंबरपासून होत आहे. या विक्री अभियानात कुठलाही दलाल वा मध्यस्थ नसल्याने शेतमाल स्वस्त दरात मिळणार आहे. त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस भरणारा हा बाजार नंतर दररोज सुरू होणार आहे.

येथे असतील शेतमाल विक्री केंद्र

  • ठाणे पोलिस लाईनमधील सिद्धी हॉल
  • पोलिस आयुक्तालयातील मध्यवर्ती कॅन्टीन
  • नवीन पोलिस लाईन
  • पोलिस अधिकारी-कर्मचारी वसाहत
  • वर्तकनगर साईबाबा मंदिर
  • राबोडी पोलिस ठाण्याजवळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com