निसर्ग पाहण्याचे तीन दृष्टिकोन...

forest
forest

जंगलाकडे प्रत्येकजण वेगवेगळ्या  दृष्टीकोनातून पाहतो. जंगलाचा प्रकार कोणता? त्यात दिसाणारी झाडं कोणती, त्यांची नावं काय, त्यांची शास्त्रीय नावं काय, पानांचा प्रकार काय, फुलं कोणत्या रंगाची, त्यांना पाकळ्या किती, स्त्रीकेसर, पुकेसर, परागकण, फळांचा प्रकार काय, चव काय, वास कसा, औषधी आहेत का नाही, इतर काही उपयोग आहे का वगैरे... मग पक्षी दिसला तर त्याचं नाव, शास्त्रीय नाव, जात, उपजात, यलो थ्रोटेड आहे का व्हाईट थ्रोटेड, गालावर लाल आहे का शेपातीखाली ठिपका आहे, साप दिसला तर त्याचं लोकल नाव, शास्त्रीय नाव, इंग्रजी नाव, त्याचे खवले मोजा, डोळ्यापासून मागे आणि नाकापासून कुठेतरी, नर आहे का मादी, ते वरून कळत नाही, कुठेतरी बोटं वगैरे घालून पाहावं लागतं, त्यासाठी ‘स्नेक कॅच’ करा, त्यासाठी टेल कॅच करा किंवा माउथ कॅच करा, किडा दिसला तर त्याला पकडा, फोर्मालीन मध्ये घाला, पिनिंग करा, काहीही करून दिसणाऱ्या प्रत्येक जीवाची ओळख पटवून घ्या. त्याचं नाव, खानदान, अतापता माहिती व्हायलाच पाहिजे! ही झाली शास्त्रीय पद्धत. 

दुसरी पद्धत, सारखा कॅमेरा जवळ बाळगा, त्याला स्वतःपेक्षा जास्त सांभाळा, त्याचं कीट सतत बरोबर बाळगा, निरनिराळ्या लेन्सेस जवळ बाळगा, ट्रायपोईड जवळ बाळगा, एखादं लहान पोर जवळ बाळगल्यासारख! समोर जे काही दिसतंय ते पाहिलं लेन्स मधून बघा. मग फोकल लेन्थ नीट करा, फोकस झालं का? मग अपर्चर बघा, सगळं सेटिंग बघा, प्रकाश बघा, अँगल बघा, सगळं बरोबर असलं तर क्लिक करा, मग फ्रेम नीट आली आहे का ते बघा, ती कधीच समाधानकारक वाटत नाही, मग दुसरा, तिसरा, मग अनेक.. लक्ष्य एकाच फोटो चांगला मिळाला की नाही, इकडेच! मग मुक्कामाच्या ठिकाणी आलं की पुन्हा एकदा सगळे ‘स्नॅप्स’ बघा, फारसे न आवडलेले ‘डिलीट’ करून टाका, जास्त फोटो वाघाचेच! मग ही पोझ आत्तापर्यंत मिळाली नव्हती, चार वर्षांनी मिळाली वगैरे. 

तिसरा प्रकार म्हणजे मोकळ्या हातानं जंगलात जाण्याचा! कॅमेरा नको, लिखापढी नको, कसलं संकलन नको, हत्यारं नकोत, डोळे, कान आणि नाक हीच साधनं! दिसेल ते पाहायचं, चहूकडे नजर ठेवायची, ऐकू येईल ते ऐकायचं, जंगलाचा म्हणून एक वास असतो, तो नाकात भरून घ्यायचा, जंगलाचं ‘फील’ घ्यायचं, सकाळ, दुपार, संध्याकाळ कशी होतेय, रात्र कशी पडत जातेय, धुकं कसं आहे, दंव कसं पडतंय, गवत कसं ओलं झालंय, ओढे कसे वाहतायत, त्यातल्या पाण्यानं कसे आकार तयार केलेत, कशी चित्रकला केली आहे, पाणवठे कसे तयार झालेत, त्यात निवळ्या कशा पोहोतायात, बेडकं कशी ओरडतायत, ओढ्याचं पाणी किती स्वच्छ आहे, झाडांचे आकार कसे आहेत, खोडांवर नक्षी कशी आहे, झाडांवर शेकरं दिसतायत का? ती कशी हळ्या देतात, सुतार पक्ष्याचा आवाज येतोय का? किड्यांची घरं, मुंग्यांची वारूळ, झाडावरच्या ढोल्या, जंगलाची दाटी, पडलेला पालापाचोळा, काटक्या, सगळ्यातला एक ओलेपणा, हवेतला गारवा, कुजलेल्या पानांचा भरून राहिलेला तो एक विशिष्ठ वास, ती नि:शब्द शांतता, त्यात ती ओढ्याच्या पाण्याची खळखळ, कधी गंभीर वाटणारी, कधी निरव शांततेला अजूनच नि:शब्द करणारी, एखादा प्राणी चालत असल्याचा पाचोळ्यात येणारा आवाज, गाव्याचं बेदरकारपणे जंगलं तुडवणं, सायंकाळ होता होता शेकारांनी घातलेला गोंधळ, रात्र जागवणारा तो रातवा, घुबडाचं घुमणं, ती काजळकाळी रात्र, तो हुडहुडी भरवणारा गारवा, दिवसभर हाडात शिरून बसणारा!.... हे सगळं मनात, डोळ्यात आणि चित्तात भरून घेणं!

मी शास्त्रज्ञ नाही. शास्त्राचा आणि अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलो, तरी जीवशास्त्र आकारावीलाच सोडलं, त्या ऐवजी भूगोल घेतला. गेल्या पंचवीस वर्षांच्या सरावानं बऱ्याच शास्त्रीय गोष्टी समजतात इतकंच! पण जंगलाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणं मला मनापासून आवडत नाही. निसर्गाचं शास्त्रीय पृथ:कारण करणं मला भावत नाही. ती शास्त्रीय नावं पाठ करण्याचा मला कंटाळा येतो. नागाला नाग म्हणण्या ऐवजी नाजा नाजा वगैरे म्हणणं मला कससंच वाटतं. पक्षी पाहताना तो यलो थ्रोटेड आहे का व्हाईट चिकड आहे यात मला फारसा रस वाटत नाही. सरावानं या गोष्टी अंगवळणी पडू लागल्या आहेत. पण सरावानं. अभ्यास करायचा म्हणून नाही. म्हणूनच म्हणतो, जंगलाकडे शास्त्रीय दृष्टीनं पाहणं मला जमत नाही, भावत नाही, रुचत नाही. 

दुसरा प्रकार कॅमेऱ्यातून जंगलं पाहण्याचा. खरं सांगायचं तर मी एक ‘फेल’ फोटोग्राफर आहे! माझ्याकडे चांगला कॅमेरा आहे, लेन्स आहे, सगळं कीट आहे. मी फोटोही काढतो. पण तो एक चान्स असतो. समोरच्या दृश्यात मी इतका गुंगून जातो, की अनेकदा फोटो काढायचंच राहून जातं! मला कॅमेऱ्याच्या व्ह्यू फाइंडर मधून जंगलं पाहता येत नाही. मला जंगल तीनशेसाठ अंशात पाहायला आवडतं. दश दिशांना घडणाऱ्या घटना टिपायला आवडतात. कान, नाक आणि डोळे सगळं एकाच वेळी चालू ठेवायला आवडतं. दश दिशांचा एकत्र ‘फील’ घ्यावा वाटतो. कॅमेऱ्याच्या तांत्रिक गोष्टीत अडकून पडायला नको वाटतं. मी जेंव्हा जेंव्हा फोटो काढतो, तेंव्हा फक्त फोटो मिळतो, पण त्या वातावरणाचं ‘फील’ मी घालवून बसतो. आणि निसर्गात एकदा घडणारी घटना पुन्हा सहसा घडत नाही. म्हणजे तिला आपण कायमचं मुकतो! फोटोग्राफी ही दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करायची असते. एकतर शास्त्रीय ‘डॉक्युमेंटेशन’ म्हणून, किंवा सोंदर्य म्हणून. पण दोन्ही दुसऱ्यासाठीच! जंगल ‘मला’ अनुभवायचं असतं. चित्तात भिनवायचं असतं. दुसऱ्याला दाखवून वाहवा मिळवायची घाई नसते. कौतुकाच्या थापेची आशा नसते. फोटोमध्ये आपण एक क्षण, एक ठिकाण, एकाच घटना दाखवू शकतो. पण निसर्ग अंगात भिनला तर तो वाणीतून, कृतीतून, उक्तीतून, व्यक्तिमत्त्वातून पाझरू लागतो. जीवनालाच निसर्गाचा सुगंध येऊ लागतो. तुम्हीच चालातं बोलातं पुस्तक बनता. प्रत्येकजण फोटोग्राफर बनू शकत नाही. आणि प्रत्येकजण फोटोग्राफर असायलाच हवा असा आग्रहही नको. 

प्रत्येकजण शास्त्रज्ञ असायलाच हवा, याचीही गरज नाही. पक्षी पहिला की त्याची जात, उपजात पाठ असायलाच हवी, अशी काहीही गरज नाही. अनेकजण शास्त्र शाखेचे नसतात. शास्त्रीय नावं माहित असायला हवीतच असं नाही. एका वनस्पती अभ्यासक विदुषीनी एका जंगल भेटीत शेदिडशे झाडांची शास्त्रीय नावं सांगून सगळ्यांना झीट आणली होती. त्यातलं एकाही नाव कुणाच्याही लक्षात राहिलं नाही. वेळ मात्र गेला. आपणच मागे पडू म्हणून जंगलात आलेले अनेकजण अशी नावं लक्षात ठेवण्याच्या प्रयत्नात धडपडताना दिसतात. यातलं काहीही लक्षात राहिलं नाही तरी काही बिघडत नाही. हळूहळू सवयीनी एकेक गोष्ट लक्षात राहू लागते. कावळा चिमणी नाही का कळत! आंबा, पिंपळ नाही का ओळखू येत. झुरळ ओळखता येतं ना? पाल समजते ना? का? हे सगळं सवयीनं ओळखायला यायला लागलं. तसच जंगलातलंही ओळखता येऊ लागेल! 

पहिल्या दोन्हीही भूमिकेत आपण नसू तर तिसरी, निरीक्षकाची भूमिका जास्त सोपी आहे. निसर्ग फक्त पाहात रहा. त्याचे आवाज ऐकत रहा. तिथलं वातावरण अंगात भिनवत रहा. तिथल्या हवेशी एकरूप व्हायचा प्रयत्न करा, निसर्गातली स्पंदनं जाणवू लागतील. घडणाऱ्या घटना समजू लागतील. त्याचे अर्थ उलगडू लागतील. 

पण त्यासाठी जंगलात जायला हवं. जाताना आपण कोण आहोत ते विसरायला हवं. तिथं गेल्यावर काहीच करायला नको. अध्यात्म म्हणतं, काही करण्यापेक्षा काहीही न करण जास्त अवघड आहे. जंगलात तेच करायला हवं. म्हणजे काहीही करायला नको. हालचाल नको, बोलण नको, कसलीच खळबळ नको. एकाच जागी बसून राहावं, तासंतास! आजूबाजूला काय घडतंय ते फक्त पाहत राहावं..... एखाद्या शिळेसारखं! निसर्ग अपोआप हळूहळू समजायला लागेल, बोलू लागेल, त्याची स्पन्दनं जाणवू लागतील. आणि सुरू होईल निसर्गाशी ‘तादात्म्य’! 

(लेखक प्रसिद्ध वन अभ्यासक आहेत. या लेखमालिकेचा तिसरा भाग लवकरच प्रसिद्ध केला जाईल. आगामी लेखाचा विषय जंगलास "पाहताना‘ स्वत:मध्ये करावयाचे बदल,  असा असेल) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com