मुलांच्या हाती पारंपरिक ढोल-लेझीम

मुलांच्या हाती पारंपरिक ढोल-लेझीम

सुपे - पारंपरिक ढोल-लेझीम या खेळाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. या पार्श्‍वभूमीवर काऱ्हाटी (ता. बारामती) येथील काही ज्येष्ठ मंडळींकडून तरुण पिढीला या खेळाचे धडे दिले जात आहेत.   

संत सावतामाळी लेझीम मंडळाच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे. ग्रामदैवत श्री यशवंतराय मंदिराच्या आवारात तर कधी जानाई मंदिराजवळील पटांगणात सध्या ढोल-लेझीमचा सराव चालू आहे. उभे राहून व गुडघ्यावर बसून खेळल्या जाणाऱ्या नृत्याच्या अनेक प्रकारांपैकी काही प्रकार सध्या येथे शिकवले जात असल्याची माहिती विलास लोणकर, रामभाऊ लडकत यांनी दिली. 

येथील ऋतुराज राऊत हा विद्यार्थी ढोल वाजवतो. शाळेतील मित्रांना या खेळासाठी प्रवृत्त करतो. अलीकडच्या तरुणांना डीजेचे आकर्षण वाढत असताना येथील तरुण मात्र, ढोलाच्या तालावर नाचायला स्वयंस्फूर्तीने येत आहेत. अगदी पाच वर्षांच्या मुलांपासून ४०-४५ वर्षांच्या तरुणांपर्यंत या खेळाची आवड निर्माण झाली आहे. 

दहावी-बारावीच्या परीक्षेमुळे जानेवारीनंतर विद्यार्थ्यांसाठी खेळ बंद ठेवणार आहे. तर २५ वर्षांपुढील तरुणांसाठी सराव चालू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील काही महिलासुद्धा या खेळात पारंगत आहेत. 

या खेळासाठी येथील तुषार राऊत, संजय जाधव, विठ्ठल जाधव, दशरथ जाधव, महादेव जाधव, भीमदेव जाधव, सुभाष जाधव, दत्तात्रेय जाधव आदींसह ग्रामस्थांचे सहकार्य मिळते.  

वेगळे डाव व कौशल्य
  काऱ्हाटी गावात २५ ढोल, ५० लेझीम आणि २० झांजा आहेत. 
  लेझीम डावासाठी वाजवणारे ठरावीकच लोक आहेत. 
  झांज पथकाच्या ढोलाचा ताल वेगळा तर ढोल-लेझीमचा ताल वेगळा असतो. 
  प्रथम, दुसरा, तिसरा असे प्रकार असतात. 
  गजीनृत्य, हलगीवरची लेझीम त्याचे डाव वेगळे. 
  ढोलाच्या जोडीला ताशा व झांज वाजवणाऱ्यालाही कौशल्य असावे लागते. 

मोबाईलमुळे व्यायामाकडे दुर्लक्ष
पूर्वी शरीराला व्यायाम होईल असे कबड्डी, कुस्त्या, चेंडू, लघोरी, सूर-पारंब्या खेळल्या जायच्या. टाळ-मृदंगाच्या, ढोल-लेझीमच्या तालावर नाचायचे. यामुळे चांगला व्यायाम होऊन मन प्रसन्न असायचे. समाधान वाटायचे. या निमित्ताने गावकऱ्यांची एकजूट व्हायची. आता अशा खेळाचे प्रमाण कमी झाल्याने, तरुण पिढी आजार, व्यसनाकडे झुकत आहे. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, टीव्ही, मोबाईलमुळे शारीरिक व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून असे पारंपरिक खेळ चालू राहिले पाहिजेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com