आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

जळगाव - लोकवर्गणीतून घेण्यात आलेली रुग्णवाहिका.
जळगाव - लोकवर्गणीतून घेण्यात आलेली रुग्णवाहिका.

जळगाव - आदिवासी तडवी भिल्ल समाज तसा मागासलेला. अनेकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने रुग्णाला नेण्यासाठी समस्या उद्‌भवत असते. समाजातील नागरिकांबाबत अशा घडलेल्या घटना पाहून, या खडतर प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी समाजासाठी रुग्णवाहिका घेण्याचा हुंकार भरण्यात आला. याकरिता व्हॉटस्‌ॲप ग्रुपवरून करण्यात आलेल्या आवाहनाला समाजातील एक हजार बांधवांनी एकजूट करत मदतीचा हात पुढे केला. यातून जमा झालेल्या लोकवर्गणीतून रुग्णवाहिका खरेदी करून त्याचे लोकार्पण करण्यात आले.

जंगली पीर बाबा (रह.) भोकरी (ता. रावेर) येथील दर्गा तडवी भिल समाजाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो. तडवी समाजातील गरीब, श्रीमंत सगळेच येथे येतात. याच ठिकाणी तडवी समाजाचा रुग्णवाहिकेचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा ६ जूनला झाला. समाजाने लोकवर्गणीतून एक रुग्णवाहिका घेतली असून, आणखी रुग्णवाहिका समाजातील हानिफ तडवी यांनी सेवानिवृत्तीच्या मिळालेल्या पैशातून घेऊन दिली आहे. 

मुंबईतील घटनेनंतर हाक
तडवी भिल्ल समाजाची रुग्णवाहिका घेण्यापूर्वी म्हणजे सात- आठ महिन्यांपूर्वी जैतुनबाई नामक तडवी समाजातील महिला मुंबईला पाला विक्रीसाठी जात असताना मुंबईतील दादर स्टेशनवर रेल्वे अपघातात जखमी झाली. मेंदूला मार लागून कोमात गेली. प्राणाशी झुंज देत तिचा मृत्यू झाला. मुंबईतील नोकरवर्गाने खूप प्रयत्न केले असता जैतुनबाईला रूग्णवाहिकेने घरी आणण्यासाठी खूप समस्या निर्माण झाल्या. त्यानंतर अशा तीन घटना घडल्या. यामुळेच आक्‍टोबरमध्ये कल्याण (नेतीवली) येथे तडवी भिल समाज बांधवांची मीटिंग घेऊन रुग्णवाहिका घेण्यावर भर देण्यात आला आणि त्या दिशेने कार्य सुरू झाले.

व्हॉटस्‌ॲप ग्रुपमधून आवाहन
तडवी समाजातील होतकरू, मेहनती, समाजाच्या प्रेमाणे भारावलेले, समाजहित चिंतक नवयुवकांच्या भावनिक आपुलकितून व समाजातील तमाम बांधवांच्या समाजापोटी असलेली आपुलकीतून रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लागला. याकरिता सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करण्यात आला. यासाठी जिल्ह्यातील समाजसेवक, नोकरदार यांच्या व्हाॅट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून तसेच समाजातील सामाजिक व्हॉटस्‌ॲप ग्रुपच्या सदस्यांना आवाहन करण्यात आले. याला समाजाने समर्थन देत मदतीचा ओघ सुरू केला. अर्थात, मदत करणारे एकमेकांना ओळखत नसून, केवळ आवाहन प्रतिसाद आणि विश्‍वासातून रुग्णवाहिका उभी राहिली आहे. समाजातील गरीब- श्रीमंत अन्‌ शेतकऱ्यांपासून ते व्यवसायीकांपर्यंत अगदी ५० रुपयांपासून ७७ हजार ७७७ रुपयांपर्यंत मदत केली गेली. यात साधारण २० लाख रुपयांची लोकवर्गणी जमा झाली होती.

रुग्णवाहिकेच्या नावाखाली एकतेचा संदेश
तडवी समाजाच्या संघटनेच्या नावाचा वापर न करता केवळ रूग्णवाहिकेच्या अंजेड्याखाली एक व्हा असा संदेश देण्यात आला. तडवी समाजात अनेक कार्यक्रम राबवले; परंतु रूग्णवाहिकेच्या या अजेंड्याला अपेक्षेपेक्षा जास्त पाठबळ लाभले. रूग्णवाहिकेमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच विविध देशात व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी स्थिरावलेले तडवी समाज बांधव असे एक हजार जणांनी मदतीचा हात पुढे केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com