esakal | Video : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’!
sakal

बोलून बातमी शोधा

हडपसर : भाजी विकून चरितार्थ चालवणारा नागेश किन्नूर (डावीकडील).

भाजीविक्रीचा व्यवसाय करताना अनेकदा अतिक्रमण विभागाकडून माल जप्त करण्यात येतो. कधी दंड घेतला जातो. त्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. एखाद्या दिवशी मिळालेली सर्व कमाईच दंडामध्ये जाते. शासनाने व्यवसाय करण्यासाठी कायमस्वरूपी अधिकृत जागा द्यावी, यासाठी प्रयत्न करीत आहे.
- नागेश किन्नूर, भाजीविक्रेता

Video : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व जिद्द अनेकांना प्रेरणा देत आहे.

नागेश १९९७ ला सोलापूरहून पुण्याला नोकरीच्या शोधात आला होता. सुरुवातीला एका बांधकाम व्यावसायिकाकडे बिगारी काम करून तो पोट भरत होता. एक दिवस तो काम करीत असताना त्याला विजेचा धक्का बसला. या अपघातात त्याचे दोन्ही हात निकामी झाले. बांधकाम व्यावसायिकाकडून त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. तब्बल तीन वर्षे नागेशचे रुग्णालयात उपचार सुरू होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नुकतेच लग्न झालेल्या नागेशला समोर अंधार दिसत होता. पण, त्याही स्थितीत त्याने लढाई सुरूच ठेवली. हाताचे दोन्ही पंजे नसल्यामुळे त्याला कोणी काम देत नव्हते. कुटुंब कसे चालवायचे, याची त्याला चिंता लागून राहिली होती. ती त्याला शांत बसू देत नव्हती. अखेर त्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नातेवाईक व मित्रांकडून आर्थिक मदत घेतली. १० वर्षांपासून तो भाजीविक्रीचा व्यवसाय करीत आहे.

सुरुवातीला त्याने सुखसागरनगर येथे हा व्यवसाय सुरू केला. सध्या तो हडपसर येथील गाडीतळ येथे उड्डाण पुलाखाली भाजीविक्रीचा व्यवसाय करीत आहे. त्याची पत्नी सुवर्णा ही त्याला व्यवसायामध्ये मदत करते. त्यामुळे नागेश रोजच्या लढाईत नियतीवर मात करतोय.