शिक्षक दांपत्य बनले वनिताचे माता-पिता!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

कर्तव्याला मानवतेची जोड देत आपल्या ज्ञानदानाच्या प्रमुख कर्तव्याबरोबरच समाजहिताला प्राधान्य देत आपल्या विद्यार्थिनीला शिक्षण देऊन शिक्षणाबरोबरच आपले सामाजिक भान कायम ठेवून त्या विद्यार्थिनीला डी. एड. पर्यंतचे शिक्षण देऊन अगदी त्या मुलीच्या लग्नात आई-वडील म्हणून कन्यादान करण्याचे काम म्हाते खुर्द (ता. जावळी) येथील शिक्षक दांपत्य रघुनाथ तानाजी दळवी व शशिकला रघुनाथ दळवी यांनी केले आहे.

केळघर - कर्तव्याला मानवतेची जोड देत आपल्या ज्ञानदानाच्या प्रमुख कर्तव्याबरोबरच समाजहिताला प्राधान्य देत आपल्या विद्यार्थिनीला शिक्षण देऊन शिक्षणाबरोबरच आपले सामाजिक भान कायम ठेवून त्या विद्यार्थिनीला डी. एड. पर्यंतचे शिक्षण देऊन अगदी त्या मुलीच्या लग्नात आई-वडील म्हणून कन्यादान करण्याचे काम म्हाते खुर्द (ता. जावळी) येथील शिक्षक दांपत्य रघुनाथ तानाजी दळवी व शशिकला रघुनाथ दळवी यांनी केले आहे.

ज्ञानदानाची सेवा करताना मामुर्डी (ता. जावळी) येथे वनिता मुकणे ही आदिवासी कातकरी समाजातील मुलीला शिक्षिका करण्याबरोबरच तिच्या लग्नात कन्यादान करताना संसारोपयोगी साहित्य भेट देऊन दळवी दांपत्याने खऱ्याअर्थाने आदर्श गुरूची भूमिका पार पाडली आहे. वनिता मामुर्डी शाळेत शिकत असताना दळवी यांचा वनिताशी संपर्क आला. शाळेत अत्यंत हुशार असलेल्या वनिताची विचारपूस त्यांनी केली. तिची कौटुंबिक पाश्वर्भूमी पाहून दळवी यांना धक्का बसला. उपेक्षित व शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसो दूर असलेली वनिता शाळेत अत्यंत हुशार होती. तिला आईची माया कधीच मिळाली नाही, तर वडील दृष्टिहीन असल्यामुळे दिवसभर काहीतरी काम केले, तरच संध्याकाळी चूल पेटायची, अशी तिची बिकट परिस्थिती होती. वनिताची ही परिस्थिती पाहून शाळेत चुणचुणीत असलेल्या वनिताची प्राथमिक शिक्षणापासूनची सर्व जबाबदारी दळवी दांपत्याने घेतली.

भटक्‍या आदिवासी समाजातील वनिता या सवर्सामान्य मुलीला डी. एड. चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दळवी दांपत्याने मदतीचा हात पुढे केला. उपेक्षित समाजातील, घरातील आईचे छत्र हरवलेल्या मुलीला शिक्षिका करण्याचे काम दळवी दांपत्याने केले. आज वनिता ही भटक्‍या आदिवासी कातकरी समाजाला आदर्श घालून देत ज्ञानदानाचे कार्य पार पाडत आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा या उक्तीला जागून दळवी दांपत्याने या मुलीला संपूर्ण संसारोपयोगी साहित्य भेट दिले.

आज दळवी दांपत्याने जर वनिताला आधार दिला नसता, तर उपेक्षित कातकरी समाजातील वनिता घरातच खितपत पडली असती. मात्र, शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याच्या संपूर्ण आयुष्य सुखकारक करण्यासाठी आजही दळवी दांपत्यासारख्या शिक्षकांची समाजाला नितांत गरज आहे.

दळवी दांपत्याच्या या आदर्शवादी भूमिकेमुळे आजही शिक्षणापासून मैलोनमैल दूर असलेले उपेक्षित समाजातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आल्याशिवाय राहणार नाहीत. दळवी दांपत्याची ही कृती समाजासाठी अभिमानस्पद व प्रशंसनीय आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanita Mukane Marriage by Teacher Couple Motivation Initiative