भाजीवाल्याची मुलगी झाली पोलिस कॉन्स्टेबल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

बावधन - सुतारदऱ्यात त्यांची दहा बाय दहाची छोटेखानी खोली आहे. तिच्या वडिलांचा भाजीचा व्यवसाय, तर आईची धुण्याभांड्याची कामे. पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणाऱ्या आईवडिलांच्या प्रपंचाला मदत करीत पूजा ज्ञानेश्वर शिंदे ही युवती पोलिस कॉन्स्टेबल झाली आहे. जिद्दीच्या जोरावर, सातत्याने परिश्रम करून कौटुंबिक परिस्थितीलाही झुकवित सरस्वतीची पूजा करीत तिने हे यश मिळविले. 

बावधन - सुतारदऱ्यात त्यांची दहा बाय दहाची छोटेखानी खोली आहे. तिच्या वडिलांचा भाजीचा व्यवसाय, तर आईची धुण्याभांड्याची कामे. पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणाऱ्या आईवडिलांच्या प्रपंचाला मदत करीत पूजा ज्ञानेश्वर शिंदे ही युवती पोलिस कॉन्स्टेबल झाली आहे. जिद्दीच्या जोरावर, सातत्याने परिश्रम करून कौटुंबिक परिस्थितीलाही झुकवित सरस्वतीची पूजा करीत तिने हे यश मिळविले. 

पाचवी शिकलेले ज्ञानेश्वर आणि अंगठेबहाद्दर हिराबाई हे शिंदे कुटुंबीय व्यवसायासाठी पुण्यात सुतारदऱ्यात राहू लागले. ज्ञानेश्वर यांनी भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला, तर हिराबाई दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करीत प्रपंचाला हातभार लावू लागल्या. पूजा त्यांची थोरली मुलगी. तिचे आठवीपर्यंतचे शिक्षण कोळवण (ता. मुळशी) येथे चुलत्यांकडे झाले. पौड रस्त्याच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात तिची पदवी झाली. 

तिला लहानपणापासूनच पोलिस व्हायचे होते; परंतु या क्षेत्राबाबत ती पूर्णपणे अनभिज्ञ होती. महाविद्यालयातील मित्रमैत्रिणींच्या सर्कलमधून पोलिस प्रशिक्षणाची माहिती तिने मिळविली. सुरवातीला आई-वडिलांचा मात्र पूजाच्या पोलिस होण्याला विरोध होता. त्यामुळे आई-वडिलांना न सांगताच तिने स्वराज ऍकॅडमीत प्रवेश नोंदविला. सकाळी वॉकिंगला जायचे कारण सांगून ती म्हातोबा डोंगरावर जाऊन पोलिस होण्यासाठी शारीरिक कसरत करू लागली. 

पार्टटाइम नोकरी करीत तिने महाविद्यालयीन शिक्षण घेतले. वेळेची बचत व्हावी, यासाठी स्वत-च्या कमाईतून दुचाकी घेतली. 

सकाळी साडेपाच वाजता ती उठायची. स्वारगेटला सणस मैदानात जाऊन सराव करायची. घरी आल्यानंतर लेखी परीक्षेच्या क्‍लासला जायची. त्यानंतर नोकरी. सायंकाळी पुन्हा शारीरिक कसरत, असा तिचा दिनक्रम चालू होता. 3 एप्रिलला ठाण्याला तिची शारीरिक क्षमता चाचणी, तर 17 ला लेखी परीक्षा झाली. या परीक्षेत तिने घवघवीत यश संपादन करीत पोलिस कॉन्स्टेबल पदावर शिक्कामोर्तब केले. सुरवातीला विरोध करणाऱ्या आई-वडिलांना पोरगी पोलिस झाल्याचे कळताच त्यांचा ऊर भरून आला; परंतु केवळ पोलिस कॉन्स्टेबल पदावर पूजा खूष नाही. तिला स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस अधिकारी व्हायचे आहे. 

पूजा म्हणते की, पोलिस अधिकारी व्हायचे माझे स्वप्न आहे. कुठल्याही परिस्थितीत ते पूर्ण करण्याचा माझा संकल्प आहे. कोणतेही यश मिळविण्यासाठी त्याचा पाठलाग केला पाहिजे. त्यासाठी स्वत-ला झोकून देऊन अभ्यास केला पाहिजे. 

Web Title: vegetables daughter was police constable