चार तासांतच गाव झालं स्वच्छ

शेरे - येथे रविवारी झालेल्या स्वच्छता अभियानात सहभागी झालेला तरुण वर्ग.
शेरे - येथे रविवारी झालेल्या स्वच्छता अभियानात सहभागी झालेला तरुण वर्ग.

रेठरे बुद्रुक - गाव करील ते राव काय करील, याची प्रचिती देत शेरेतील शेकडो तरुणांनी एकत्र येत ग्रामस्वच्छता अभियान राबवले. हातात फावडे, खोरे, खुरपे व बकेट घेऊन केवळ चार तासांमध्ये सर्वांनी गावातील कोपरा न्‌ कोपरा स्वच्छ करून दाखवला. पदवीधर तरुण, उच्चपदस्थ नोकरदार, महिलांसह, चिमुरडे व ज्येष्ठांचा या स्वच्छतेस हातभार लागला. 

काल (रविवारी) सकाळी गावातील सर्व मंडळांचे कार्यकर्ते व पुणे-मुंबईच्या ठिकाणी व्यवसाय व नोकरीनिमित्त असलेले तरुण श्री भीमाशंकर मंदिरात एकत्र आले. तेथे सर्वांनी एकत्रित प्रार्थना केली. त्यानंतर विभागानुसार बनवलेले ग्रुप स्वच्छतेसाठी रवाना झाले. झाडवेली, कचरा, निरुपयोगी झाडांनी नकोशा झालेल्या ठिकाणांचे व कोपऱ्यांचे भाग, सार्वजनिक ठिकाणे, मंदिर, ग्रामपंचायत व शाळांचा परिसर स्वच्छ करत तुंबलेली गटारेही त्यांनी वाहती केली. स्वच्छता करताना तरुणांना उत्साह वाटावा, याकरिता पहाटेच गावभर रस्त्यांच्या दुतर्फा रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. दुपारी १२ वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबवले गेले. ज्याठिकाणी जास्त स्वच्छतेची गरज होती. त्याठिकाणी सर्व जण एकत्र येऊन तो भाग त्यांनी स्वच्छ केला. सर्व स्वयंसेवकांच्या डोक्‍यावर ‘स्वच्छ शेरे... सुंदर शेरे’ असे घोषवाक्‍य असलेल्या टोप्या घातल्या होत्या. स्वच्छतेनंतर सर्वांनी आपपल्या घरातून आणलेली शिदोरी एकत्र करून भोजन केले. कार्यक्रमाची सांगता विठ्ठल मंदिरात झाली.

त्या वेळी सामाजिक कार्यकर्ते भरत कदम यांनी ‘आदर्श गाव व तरुणांची प्रेरणा’ या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्याते प्रा. श्रीधर साळुंखे, निवृत्त शिक्षक दिनकरराव निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. बाळासाहेब ऊर्फ माउली निकम यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप निकम यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com