‘व्हॉट्‌सॲप ब्रॉडकास्टिंग’ ग्रुपमधून मतदार जागृती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

जळगाव -  निवडणुकीत मतदानाचा टक्‍का वाढवा, यासाठी जनजागृतीचे काम प्रशासनाकडून होत असले, तरी वैयक्‍तिकपणे स्वतःहून कोणी या कामासाठी पुढाकार घेत नाही. अशात महिनाभर मतदार जागृती करण्याचे कार्य जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षक अरुण पाटील यांनी ‘व्हॉट्‌सॲप’च्या ‘ब्रॉडकास्टिंग ग्रुप’च्या माध्यमातून करीत २५० कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

जळगाव -  निवडणुकीत मतदानाचा टक्‍का वाढवा, यासाठी जनजागृतीचे काम प्रशासनाकडून होत असले, तरी वैयक्‍तिकपणे स्वतःहून कोणी या कामासाठी पुढाकार घेत नाही. अशात महिनाभर मतदार जागृती करण्याचे कार्य जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षक अरुण पाटील यांनी ‘व्हॉट्‌सॲप’च्या ‘ब्रॉडकास्टिंग ग्रुप’च्या माध्यमातून करीत २५० कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

ॲन्ड्रॉइड मोबाईल प्रत्येकाच्या हातात असल्याने ‘व्हॉट्‌सॲप’पासून कोणी दूर राहिलेले नाही. यात तरुण वर्ग अधिक जुळला असल्याने याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मतदार जागृती करण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळद बुद्रुक (ता. पाचोरा) येथील बीएलओ तथा उपशिक्षक अरुण पाटील यांनी केले. व्हॉट्‌सॲपमधील ब्रॉडकास्टिंग ग्रुपच्या माध्यमातून मतदार जागृती अभियान राबवीत आहे. यासाठी जागृतीपर इमेज, व्हिडिओ, स्लोगन नेटवरून डाऊनलोड केले; तर काही लिखाण स्वतः करून ते सर्व ब्रॉडकास्टिंग ग्रुपच्या माध्यमातून एकाच वेळी २५० जणांपर्यंत संदेश पोहचविण्याचे काम केले. या राष्ट्रीय उपक्रमासाठी त्यांना प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार बी. ए. कापसे, नायब तहसीलदार संभाजी पाटील, गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. 

एक जानेवारीपासून अभियान
उपशिक्षक अरुण पाटील यांनी मतदार जागृती करण्याचा उपक्रम राबविण्यास एक जानेवारीपासून सुरवात केली. अभियान सुरू केल्यानंतर पहिल्या आठ दिवसांत व्हॉट्‌सॲप वापरणाऱ्या युवकांचे मोबाईल क्रमांक जमा केले. यातून २५० जणांचे क्रमांक मिळविल्यानंतर त्याचा ब्रॉडकास्टिंग ग्रुप तयार केला. यानंतर आठ जानेवारीपासून या ग्रुपपवर मतदार जागृतीपर संदेश टाकून २५० कुटुंबांपर्यंत पोहोचविले. याशिवाय व्हीव्ही पॅट प्रशिक्षणांतर्गतदेखील त्यांनी अनेक मतदारांना प्रशिक्षण देण्यासाठी एकत्रित करण्याचे काम केले आहे.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जानेवारीत मतदार जागृती अभियान व्हॉट्‌सॲपच्या माध्यमातून राबविले. पण, एवढ्यावरच न थांबता मतदानाची तारीख जाहीर झाल्यानंतर हे काम सुरूच ठेवणार आहे, जेणेकरून मतदानाची टक्‍केवारी वाढण्यास मदत होईल.
- अरुण पाटील, उपशिक्षक, जि. प. शाळा बाळद बुद्रुक, ता. पाचोरा

Web Title: Voters awareness from the WhatsApp Broadcasting Group