'वाई अर्बन'तर्फे 25 ऑक्‍सिजन सिलिंडर; सामाजिक बांधिलकीतून निर्णय

भद्रेश भाटे | Sunday, 13 September 2020

कोरोना काळात बॅंकेने महसूल विभाग, पोलिसांना मास्क व सॅनिटायझर दिलेले होते. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्ये पोलिसांच्या दुपार व रात्रीचे भोजन उपक्रमासाठी सहकार्य केले होते. सध्या कोरोनाचे अनेक रुग्ण ऑक्‍सिजनअभावी त्रस्त आहेत. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांवर ताण आहे. ऑक्‍सिजन बेडचा तुटवडा असल्याचे अध्यक्ष सी. ए. चंद्रकांत काळे यांनी सांगितले.

वाई (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्गजन्य आजाराचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन येथील दि वाई अर्बन को ऑप बॅंकेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कोरोना रुग्णांसाठी मास्क किटसह 25 ऑक्‍सिजन सिलिंडर शासनाकडे सुपूर्द केले आहेत, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष सी. ए. चंद्रकांत काळे यांनी दिली. 

येथील शासकीय विश्रामधामाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात प्रांताधिकारी संगीता राजापुरकर-चौगुले यांच्याकडे हे सिलिंडर सुपूर्द करण्यात आले. या वेळी तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदय कुसुरकर, श्री. काळे, संचालक ऍड. प्रतापराव शिंदे, मदनलाल ओसवाल, मनोज खटावकर, डॉ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, संचालिका गीता कोठावळे, अनिल देव, सीईओ श्रीपाद कुलकर्णी आदी उपस्थित होते. श्री. काळे म्हणाले, "गेल्या 5-6 महिन्यांपासून सर्वत्र कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराचे अनेक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे बॅंकेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून 25 ऑक्‍सिजन सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंक नेहमीच विविध आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात देऊन समाजाप्रती जिव्हाळा जोपासता आली आहे. 

शरद पवारांचा तो शब्द बाळासाहेबांनी पाळला!

कोरोना काळात बॅंकेने महसूल विभाग, पोलिसांना मास्क व सॅनिटायझर दिलेले होते. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्ये पोलिसांच्या दुपार व रात्रीचे भोजन उपक्रमासाठी सहकार्य केले होते. सध्या कोरोनाचे अनेक रुग्ण ऑक्‍सिजनअभावी त्रस्त आहेत. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांवर ताण आहे. ऑक्‍सिजन बेडचा तुटवडा आहे. हे लक्षात घेऊन बॅंकेच्या संचालक मंडळाने मास्क किटसह 25 ऑक्‍सिजन सिलिंडर सुपूर्द केले आहेत.'' भविष्यातही बॅंक जास्तीत-जास्त मदत करेल, असेही श्री. काळे यांनी सांगितले. सौ. राजापूरकर-चौगुले यांनी बॅंकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे