टाकाऊ टायरपासून साकारला बंधारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

वेंगुर्ले - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले आणि पालिकेतर्फे येथील पत्र्याच्या पुलाखालील ओढ्यावर टाकाऊ टायरपासून बंधारा बांधण्यात आला.

वेंगुर्ले - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले आणि पालिकेतर्फे येथील पत्र्याच्या पुलाखालील ओढ्यावर टाकाऊ टायरपासून बंधारा बांधण्यात आला.

कोकणात सर्वसाधारणपणे ३५०० मिमी पाऊस पडूनसुद्धा मॉन्सूननंतर सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासतेच. एप्रिल-मे मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर मृद व जल संधारणाची कामे राबवून, नाल्यावर साखळी पद्धतीने कमी खर्चाचे बंधारे बांधून जलसंवर्धन करणे अति महत्त्वाचे आहे. या बाबीचा विचार करून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने टाकाऊ टायरपासून बंधारा बांधण्याची कोकण विभागाकरिता शिफारस केली आहे. वनराई, मातीनाला बांध इत्यादीसारख्या तात्पुरता बंधारा बांधण्यासाठी बांधकामास आवश्‍यक साहित्याची मर्यादित उपलब्धता तसेच प्रत्येक वर्षी बांधकाम करण्याकरिता मनुष्यबळाचा अभाव यासारख्या अडचणी येतात.

याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे खराब झालेल्या टायरचा वापर करून बंधारा बांधण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्गकडून उपलब्ध अर्थसाहाय्यातून हा बंधारा बांधला. 

या बंधाऱ्याची उंची १ मीटर व लांबी १५ मीटर आहे. आजच्या घडीला बंधाऱ्यामधील पाण्याची पातळी पूर्ण क्षमतेने वाढून मुबलक प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल. हा बंधारा बांधण्यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रदीप हळदवणेकर, वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. कोकरे, श्रीमती माधुरी परीट, गटविकास अधिकारी पंचायत समिती वेंगुर्ले तसेच प्रादेशिक फळ संशोधन केंद्र आणि पालिकेचे कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

Web Title: From waste tires played embankment