बांगड्या विकणाऱ्या महिलेच्या मुलांची परदेशात भरारी!

बाळासाहेब लोणे 
रविवार, 15 जानेवारी 2017

आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून आम्ही भावंडे यापुढेही काम करणार आहोत. आपापल्या क्षेत्रात संशोधन करून, देशासाठी काहीतरी करावे, असा आमचा मानस आहे. 
- दीपक सोनवणे, अभियंता

गंगापूर - घरची आर्थिक स्थिती नाजूक असली तरी मुलांना शिकवून मोठे करायचे, अशी जिद्द त्या माऊलीने बाळगली. घरोघरी बांगड्या विकून पै-पै गोळा करून मुलांच्या शिक्षणाची जमेल तशी तरतूद केली. मुलांनीही तिच्या कष्टाचे चीज केले, तिची स्वप्नपूर्ती केली. दोन्ही मुले शिकली अन्‌ त्यांनी नववर्षाच्या प्रारंभी नोकरीनिमित्त परदेशात झेपही घेतली आहे. गंगापूरसारख्या आडवळणी तालुक्‍याच्या ठिकाणी राहून त्यांची ही भरारी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे... 

निर्मलाबाई नामदेवराव सोनवणे यांची ही कथा. पती नामदेवराव महावितरणच्या कार्यालयात तांत्रिक कारागीर आहेत. दोन मुले, दोन मुली. घरची आर्थिक स्थिती हलाखीची. काहीही झाले तरी मुलांना चांगले शिकवायचे, असा निर्धार या दांपत्याने केला. मुलांचीही तशी मानसिकता तयार केली. पतीच्या तुटपुंज्या पगावरावर घर चालविणे अवघड आहे, हे लक्षात आल्यावर घरखर्चाला हातभार मिळावा म्हणून निर्मलाबाईंनी घरोघरी बांगड्या विकायला सुरवात केली. सोबत शिवणकामही सुरू केले. अनेक वर्षे त्यांनी सायकलवर बांगड्या ठेवून घरोघरी विकल्या. अलीकडच्या काळात त्यांनी सायकल चालविणे सोडले असले, तरी डोक्‍यावर बांगड्या नेऊन त्या फिरतात. अनेक वर्षांपासून घरोघरी जात असल्याने ग्राहकही ओळखीचे झाले. आवडनिवड माहीत झाल्याने मागणीही होते, तसा त्या पुरवठाही करतात. 

घरकाम, बांगड्या विकण्याचा व्यवसाय करीत असताना निर्मलाबाईंनी दोन्ही मुलींचे विवाह करून दिले. मोठा मुलगा नरेंद्रला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जोडारी शाखेला प्रवेश मिळवून दिला. नरेंद्रनेही त्यात प्रावीण्य मिळविले. त्याला स्कोडा कंपनीत नोकरीही मिळाली. त्याचा घरच्यांना हातभार मिळू लागला. कंपनीने त्याला जर्मनीला पाठविले आहे. लहान मुलगा दीपक अभियंता शाखेकडे वळला. त्याला बीड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यातील फ्लेक्‍स या अमेरिकन कंपनीत त्याची निवड झाली. याच कंपनीने त्याला अमेरिकेत काम करण्याची संधी दिली आहे. दोघेही नववर्षाच्या सुरवातीला परदेशात रवाना झाले आहेत. परदेशात जाण्यापूर्वी दीपकचा साखरपुडा झाला. 

शेतजमीन नाही. वीस वर्षांपासून बांगड्या विकण्याचा व्यवसाय करते. वेळ मिळेल तसे शिवणकामही करते. दोन्ही मुलांना शिकविण्याचा निश्‍चय होता; मात्र ते परदेशात जातील असे स्वप्नातही वाटले नव्हते. कष्टाचे फळ मिळाल्याचे समाधान वाटते. 
- निर्मला नामदेवराव सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman selling bangles and send children to abroad