उच्चशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणारा अवलिया 

Amit-Kumar-Banerjee
Amit-Kumar-Banerjee

जागतिक बालिका दिन विशेष 
पुणे - एकीकडे मुलगी म्हणजे "नकोशी' ही मानसिकता असताना दुसरीकडे एक-दोन नव्हे तब्बल 280 अनाथ, निराधार तसेच गरीब कातकरी कुटुंबातील मुलींचे पालकत्व एका अवलियाने स्वीकारले आहे. त्यांना उच्चशिक्षित करून, त्यांना स्वतःच्या पायावर उभी करणारी व्यक्ती समाजात आहे. 

अमितकुमार बॅनर्जी असे त्यांचे नाव. मावळातील मळवली येथे संपर्क बालग्राम संस्थेच्या माध्यमातून गेली 35 वर्षे ते हे काम अविरतपणे करीत आहेत. मूळचे बंगाली असलेले बॅनर्जी यांना जंगलात भटकंतीच्या आवडीमुळे महाराष्ट्रातील कातकरी समाजातील मुलांची स्थिती जवळून पाहिली. खायला पुरेसे अन्न नाही, अंगावर कपडे नाही, शिक्षण तर दूरची गोष्ट. पालकांच्या परवानगीने सात कातकरी मुलांना त्यांनी भाजे येथे आणले व एक झोपडी बांधून त्यात त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. हळूहळू मुलांचा आकडा वाढत गेला, तसा काटक्‍या, शेणाने सारवलेल्या झोपडीचा आकार वाढून पक्के घर झाले. 1990 मध्ये या घराला "संपर्क बालग्राम' असे नाव मिळाले. 

बॅनर्जी यांनी कातकरी, आदिवासी, अनाथ तसेच देवदासींच्या मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. आज 650 मुलामुलींचे ते पालक आहेत. त्यांचे पालन पोषण, संगोपन, शिक्षण आणि पुढे व्यवसाय-नोकरीच्या दृष्टीनेही ते प्रयत्न करतात. कित्येकांचे विवाह करून संसारही उभे केले आहेत. मुलांप्रमाणेच मुलींनाही स्वतःच्या पायावर उभे करण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. बालग्राममध्ये 150 मुली शालेय शिक्षण घेत आहेत. 74 मुली उच्चशिक्षण घेत आहेत. 56 मुली शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संस्थेने 130 मुलींचे विवाह करून दिले असून, त्या आता संसारात रमल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बॅनर्जी यांच्या पत्नी रत्ना, तसेच त्यांचे कुटुंबीय या कामात मदत करतात. काही सहकारी, सदन माता यांच्या मदतीने मुलांचे पालन पोषण आणि शिक्षण सुरू आहे. संपर्क बालग्राममध्ये मुलांना सांभाळण्यासाठी विधवा व निराधार महिलांना प्राधान्य दिले जाते. कारण त्यांना मुलांचा सहवास लाभावा व मुलांना आईची माया मिळावी, हा मुख्य उद्देश. 

पुणे जिल्ह्यात मळवली, भाजे, लोणावळा, चाकण, पुणे व भांबर्डे असे सहा अनाथाश्रम, अलिबाग (पोयनाड) येथील केंद्रात मुलांचा सांभाळ केला जातो. 

हेरिटेज वॉकमधून निसर्गप्रेमींना साद 
मळवली परिसरात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. या परिसराला "पर्यटन स्थळ' म्हणून युनोस्कोची परवानगी मिळविण्यासाठी "हेरिटेज वॉक' हा उपक्रम बॅनर्जी यांनी सुरू केला. स्थानिक लोकांना रोजगार, शिक्षण, आरोग्य व सामाजिक सोयीसुविधा उपलब्ध होतील व पर्यावरणाची हानी थांबेल, हा उपक्रमामागचा उद्देश. भाजे ते लोहगड अशा या "हेरिटेज वॉक'मध्ये दरवर्षी शेकडो निसर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक सहभागी होतात. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

""मी पाच वर्षांची असताना माझ्या बहिणीसोबत संपर्क बालग्राम (पोयनाड) संस्थेत आले. बारावीनंतर पुण्यातील अभिनव कॉलेजमध्ये "कमर्शियल अप्लाइड आर्ट' शेवटच्या वर्षाला आहे. माझ्यासारख्या अनेक मुली संस्थेमुळे शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. संगोपन आणि शिक्षणाचा खर्च संस्थाच करते.'' 
- वंदना गुंडेटी 

तरुण वयात वैधव्य आले. पदरी दोन मुले. या बिकट स्थितीत बॅनर्जी सरांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले. 30 वर्षे सदनमाता म्हणून काम केले. आज नातवंडांबरोबर मानाचे जीवन जगत आहे. 
- लता कांबळे 

अनाथ, कातकरी असे सर्वच सुविधांपासून वंचित असलेल्या मुलांना संरक्षण देणे, शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेणे, स्वतःच्या पायावर उभे करणे, जेणे करून परिस्थितीमुळे छत्र हरपलेली मुले तयार होऊ नयेत, यासाठी संपर्क बालग्रामच्या माध्यमातून काम करत आहे. 
अमितकुमार बॅनर्जी, संस्थापक, संपर्क बालग्राम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com